असे प्रशिक्षण देणारी भारतातील ही पहिली संस्था
चंद्रपूर,
Bamboo Research and Training Center शाश्वत विकास, हरित उद्योग आणि बांबू आधारित तांत्रिक शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राने मोठी झेप घेतली असून, चिचपल्ली येथील बांबू रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर (बीआरटीसी) ला अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई), नवी दिल्ली यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून तीन वर्षीय 'डिप्लोमा इन बांबू टेक्नॉलॉजी' अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता प्राप्त झाली आहे.
या मान्यतेमुळे बीआरटीसी हे भारतातील बांबू टेक्नॉलॉजी विषयातील स्वतंत्र डिप्लोमा अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळवणारी पहिली संस्था ठरली आहे.
Bamboo Research and Training Center महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई), मुंबई संलग्न या अभ्यासक्रमासाठी 60 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता मंजूर करण्यात आली आहे. ही मान्यता महाराष्ट्रातील बांबू उद्योग, हरित तंत्रज्ञान, शाश्वत रोजगार आणि ग्रामीण औद्योगिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बीआरटीसीमध्ये 2017 पासून राज्य मान्यताप्राप्त बांबू टेक्नॉलॉजी डिप्लोमा अभ्यासक्रम सुरू असून, आता एआयसीटीई मान्यता मिळाल्यामुळे या अभ्यासक्रमाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त झाली आहे.
ही अभिमानास्पद उपलब्धीः मनोज खैरनार
बीआरटीसीचे संचालक मनोज खैरनार म्हणाले, एआयसीटीईकडून प्राप्त झालेली ही मान्यता बीआरटीसी आणि संपूर्ण बांबू क्षेत्रासाठी अभिमानास्पद उपलब्धी आहे. शाश्वत विकास, हरित उद्योग, ग्रामीण रोजगार आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान क्षेत्रात बांबूचे महत्त्व वाढत असून, या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कुशल तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

