Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
बस व ट्रकच्या धडकेत 21 जण जखमी, चार गंभीर

बस व ट्रकच्या धडकेत 21 जण जखमी, चार गंभीर

सिंदेवाही/नागभीड,

Bus-truck-collision : राज्य परिवहन महामंडळाची बस व गिट्टी वाहतूक करणार्‍या ट्रकमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात बसमधील तब्बल 19 प्रवासी व ट्रकचा वाहक व चालक असे एकूण 21 जण जखमी झालेत.

जखमींमध्ये 5 लहान मुले व महिलांचा समावेश आहे. त्यातील चार जण गंभीर जखमी आहेत. ही घटना गुरूवार, 2 जुलै रोजी सायंकाळी 4.15 वाजताच्या सुमारास नागभीड-सिंदेवाही तालुक्याच्या सिमेवरील पळसगाव (जाट) नजीक तुकूम बोकडडोह नाल्याजवळ घडली.

तुमसर डेपोची बस (एमएच 14-3356) 35 प्रवाशांना घेऊन राजुरा येथून तुमसरकडे निघाली होती. यावेळी गिट्टी वाहून नेणारा ट्रक (एमएच 40 डीसी 3227) नागपूर जिल्ह्यातील पाजगाव येथून गिट्टी भरून चंद्रपूरकडे जात होता. दरम्यान, पळसगाव (जाट) जवळील तुकूम बोकडडोह नाल्याजवळील नदी पूलावर बसचे लायनर अचानक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून बसची समोरून येणार्‍या ट्रकला जोरदार धडक बसली. यात बसमधील 19 प्रवासी तसेच ट्रकचा चालक व वाहक जखमी झाले.

अपघाताची माहिती कळताच स्थानिक नागरिक व सिंदेवाही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने बाहेर काढून रुग्णवाहिकांच्या मदतीने सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे सर्व जखमींवर उपचार करण्यात आले. या अपघातात बसमधील दोन प्रवासी, ट्रकचा वाहक, चालक असे चार जण गंभीर जखमी असून, त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती आहे. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur