Dailyhunt
भाजपने केला झोपडपट्टीवासियांचा आवाज बुलंद

भाजपने केला झोपडपट्टीवासियांचा आवाज बुलंद

नागपूर,

रमाई घरकुल योजना तसेच पट्टे वाटप रोखल्याप्रकरणी संतप्त झोपडपट्टीवासियांनी भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रचंड मोर्चाने धडक देत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.

भाजपाचे शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके, आ. गिरीश व्यास, महापौर दयाशंकर तिवारी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, सचिव धर्मपाल मेश्राम, अर्चना डेहनकर, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मेंढे, विदर्भ संघटक डॉ. उपेंद्र कोठेकर, माजी आ. डॉ. मिलींद माने, संदीप जाधव आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले.

रमाई घरकुल आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांवर महाविकास आघाडी सरकारकडून अन्याय होत आहे. या लाभार्थ्यांना पक्क्या घरांचे बांधकाम करता यावे म्हणून महाविकास आघाडी सरकारने महापालिकेला 40 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची गरज तसेच शहरातील सर्व झोपडपट्टीपासियांना त्वरित मालकी हक्काचे पट्टे वाटप करणे आवश्यक आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकारने हे काम रोखल्याने लाभार्थी संतप्त आहेत.

संविधान चौकात आज हजारो संतप्त लाभार्थी गोळा झाले. राज्य सरकारविरुद्ध घोषणा देत हा मोर्चा निघाला. भारतीय जनता पक्षाचे झेंडे मोर्चेकर्‍यांच्या हातात होते. याशिवाय महाविकास आघाडी सरकारचा, मुख्यमंत्र्यांचा निषेध करणारी फलके त्यांच्या हाती होती. मोर्चा आकाशवाणीसमोर अडविण्यात आला. तेथे आ. प्रवीण दटके व इतर पदाधिकार्‍यांची भाषणे झाली. तातडीने पट्टे वाटप न दिल्यास आंदोलन तीव' करण्याचा इशारा महाविकास आघाडी शासनाला देण्यात आला.

त्यानंतर मागण्यांचे निवेदन एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विमला आर. यांना सादर केले. माजी महापौर संदीप जोशी, सुनील मित्रा, नगरसेवक बाल्या बोरकर, सतीश सिरसवान, राहुल झांबरे, बंडू सिरसाट, डॉ. किर्तीदा अजमेरा, शहर महिला मोर्चा अध्यक्ष नीता ठाकरे, परशू ठाकूर, शहर अनुसूचित जाती अध्यक्ष राजेश हातीबेड, इंद्रजित वासनिक, भय्यासाहेब विघाने, रामभाऊ आंबुलकर आदींसह अनेक पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur