Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भयावह घटनांचा इशारा

भयावह घटनांचा इशारा

वेध,

Pune-siya-goyal-case : गतवर्षी इंदोर येथील सोनम रघुवंशी प्रकरण चांगलेच चर्चेत होते. आता पुण्यातील सिया गोयल प्रकरणाने समाजमन पुन्हा हादरले आहे. समाजात अशा काही घटना घडल्या की मन सुन्न होते.

प्रेमसंबंधातून हत्या, आई-वडिलांविरुद्ध गुन्हे, शिक्षकांचा अपमान, किरकोळ कारणांवरून हिंसा, व्यसन, जबाबदारीपासून पळ काढणारी मानसिकता आणि स्वतःच्या इच्छेसाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी ही वृत्ती वाढत असल्याचेच या घटना अधोरेखित करतात. खरं म्हणजे कुटुंब पद्धती , कुटुंबातून सहज रुजणारा मूल्यसंस्कार हे आमच्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. मात्र जेव्हा अशा घटना घडतात त्यावेळी गत काही दशकांमधील झालेले बदल आणि त्याचा दृश्य परिणाम संवेदनशील मनात अस्वस्थता निर्माण करतात.

पूर्वी कुटुंबांमध्ये मुलांवर प्रेम केले जायचे, पण त्याचबरोबर शिस्तीची शिकवण देखील दिली जायची. घरात आई-वडिलांचा धाक, शिक्षकांबाबत आदर तर वडिलधार्‍यांचे ऐकण्याची सवय होती. हे करू नकोस असे कोणी सांगितले तर त्यामागे काळजी, अनुभव, प्रेम आहे हे मुलांना देखील कळत होते. आज मात्र परिस्थिती बदलल्याचे चित्र आहे. मुलं दुखावले जाऊ नयेत म्हणून त्यांना कधी रागावू नका, त्यांच्यावर कोणतेही बंधन घालू नका, त्यांच्या प्रत्येक मताला अंतिम सत्य माना, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य द्या, अशी विचारसरणी मोठ्या प्रमाणात रुजत आहे. त्याचा परिणाम असा झाला की, मुलांना प्रेम मिळते. पण मर्यादा शिकवल्या जातात का? अधिकार सांगितले गेले, पण कर्तव्याची शिकवण दिली जाते का? स्वातंत्र्य दिले गेले, पण जबाबदारीची जाणीव करून दिल्या जाते का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

आज अनेक घरांमध्ये आई-वडील मुलांचे पालक कमी आणि मित्र जास्त बनले आहेत. मित्र असणे चुकीचे नाहीच, पण पालकाची भूमिका सोडून चालत नाही. मुलाला जे हवे ते लगेच मिळते. हट्ट पूर्ण होतात. अनेकदा चूक झाली तरी तिचे समर्थन केले जाते. शाळेत शिक्षकांनी तक्रार केली तर मुलाची बाजू घेतली जाते. अशा वातावरणात वाढलेल्या मुलाला आयुष्यातील पहिला नकार, पहिला अपमान किंवा पहिले अपयश सहन करणे कठीण जाते. जीवन त्याच्या इच्छेनुसार चालत नाही तेव्हा संताप, नैराश्य, हिंसा किंवा सूडभावना निर्माण होते. म्हणूनच आज आपण पाहतो की क्षुल्लक कारणांवरून जीव घेतले जात आहेत. प्रेम नाकारले म्हणून हत्या, वाद झाला म्हणून मारामारी, समाज माध्यमावर टीका झाली म्हणून आत्महत्येचे प्रयत्न ही केवळ समस्या नाही तर पुढील पिढी भावनिकदृष्ट्या कमकुवत होत असल्याचे लक्षण आहेत.

आधुनिकतेच्या नावाखाली आपल्या परंपरा, संस्कृती आणि मूल्यांची थट्टा करण्याची प्रवृत्तीही वाढली आहे. आधुनिक होणे म्हणजे आपल्या मूल्यांचा तिरस्कार करणे नव्हे.आपल्या संस्कृतीतील कुटुंबव्यवस्था, नात्यांचे पावित्र्य, संयम, त्याग, कर्तव्य आणि नैतिकतेकडे दुर्लक्ष केले तर समाजात स्वार्थ आणि व्यक्तिकेंद्रीपणा वाढणार नाही का?

आज मुलांना सर्व काही शिकवले जाते; करिअर शिकवले जाते, तंत्रज्ञान शिकवले जाते, पैसे कमवायला शिकवले जाते. ह्या बाबी गरजेच्या आहेतच पण चांगला माणूस म्हणून जगण्या साठी सत्याच्या बाजूने उभे राहणे, चुकीची कबुली देणे, वडीलधार्‍यांचा आदर करणे, स्त्रीयांचा सन्मान करणे, अपयश स्वीकारणे आणि स्वतःच्या इच्छांवर नियंत्रण ठेवणे या मूल्यांचे शिक्षण देणार तरी कोण? याचाही विचार समाजधुरिणांनी करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. वास्तविक माणूस म्हणून जगण्याकरिता लागणारी मूल्य सहज विकसित होणारी आमची कुटुंब व्यवस्था आहे. पण आधुनिक जीवनशैली नावाच्या मृगजळा मागे धावत असताना अनेकांना ही व्यवस्था जुनाट वाटते. भौतिकतेच्या हव्यासापोटी रूढी परंपरा नकोश्या वाटतात. पण ज्या वेळी अशा भयंकर हृदयाचा थरकाप उडवणार्‍या घटना घडतात त्यावेळी मात्र संस्कार, संस्कृती, नैतिकता याची आठवण होते.

कोणत्याही राष्ट्राचे भविष्य केवळ त्याच्या भौतिक प्रगतीवर नव्हे तर ते त्या राष्ट्राच्या मुलांच्या चारित्र्यात असते. आणि चारित्र्याची पायाभरणी ही कुटुंबातील प्रेम, शिस्त, संस्कार आणि जबाबदारीची जाणीव यांच्या मजबूत आधारावरच होत असते. जर हा पाया कमकुवत झाला, तर कितीही प्रगती झाली तरी समाज आतून पोखरलेला राहतो. आज दिसणार्‍या या भयावह घटनांकडे केवळ गुन्हे म्हणून नव्हे, तर समाजाला मिळालेला गंभीर इशारा म्हणून पाहण्याची गरज आहे.

निलेश जोशी

अकोला

९४२२८६२४८४

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur