Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भिवंडी हादरलं! इमारत कोसळून ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

भिवंडी हादरलं! इमारत कोसळून ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

भिवंडी,

9 dead in Bhiwandi building collapse. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील बालाजी नगर, गंगारामवाडी परिसरातील कोहिनूर अपार्टमेंट ही चार मजली इमारत गुरुवारी मध्यरात्री अचानक कोसळून भीषण दुर्घटना घडली.

या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून दोन ते तीन जण अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेच्या पथकांकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. ही इमारत २०१२ मध्ये बांधण्यात आली होती आणि तिचे वय सुमारे १२ ते १४ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. बांधकामातील त्रुटींमुळे महापालिकेने यापूर्वीच तिला धोकादायक इमारत घोषित करून नोटीस बजावली होती. तळमजल्यावरील काही पिलर कमकुवत झाल्याने त्यांची दुरुस्ती सुरू होती.

३० जुलै रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून इमारतीला तडे जाऊ लागले, तर रात्री आठच्या सुमारास इमारत झुकू लागल्याने प्रभाग समिती क्रमांक ४ चे सहाय्यक आयुक्त अरविंद घोगरे यांनी इमारत रिकामी करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र काही रहिवासी घरातील साहित्य आणण्यासाठी पुन्हा आत गेल्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास संपूर्ण इमारत कोसळली.दुर्घटनेनंतर घटनास्थळी पोहोचण्यात अरुंद रस्त्यामुळे अडचणी आल्या. त्यामुळे प्रथम परिसरातील एक जुनी चाळ जेसीबीच्या सहाय्याने हटवण्यात आली. त्यानंतर रात्री १ वाजता एनडीआरएफ आणि टीडीआरएफची पथके घटनास्थळी दाखल होऊन ढिगारा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. स्थानिक नागरिकांनीही मदतकार्य करत अनेकांना सुरक्षित बाहेर काढले.

दुर्घटनेतून बचावलेल्या कोमल गुप्ता हिने सांगितले की, इमारत कोसळताना तिचे वडील अरविंद गुप्ता आणि आई बाहेर पडले, मात्र ती काही काळ ढिगाऱ्याखाली अडकली होती. स्वतःची सुटका करण्यात तिला यश आले. इमारतीत पिलर दुरुस्तीचे काम सुरू असतानाच हा प्रकार घडल्याचे तिने सांगितले. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी जखमींवर तातडीने उपचार सुरू असल्याचे सांगितले. तसेच अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून बाधित कुटुंबांना आवश्यक ती सर्व मदत दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur