Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चक्रमादित्याची चंचल जिव्हा

चक्रमादित्याची चंचल जिव्हा

अग्रलेख

Donald trump काही अपवाद वगळले तर अमेरिकेला लाभलेली राष्ट्राध्यक्षांची परंपरा त्या देशाने मिरवावी अशीच आहे. जॉर्ज वॉशिंग्टन ते डोनाल्ड ट्रम्प या मालिकेत आतापर्यंत ४७ राष्ट्राध्यक्ष झाले.

ट्रम्प महाशय ४५ वे राष्ट्राध्यक्ष होतेच. ४७ वे राष्ट्राध्यक्षही तेच आहेत. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख, शासन प्रमुख असतो. संघराज्याच्या कार्यपालिकेचे आणि लष्कराचे नियंत्रण राष्ट्राध्यक्षाच्या हाती असते. विसाव्या शतकाच्या आरंभापासून अमेरिका आणि जगाच्या राजकीय पटलावर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला फार महत्त्व आले. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष त्या देशापुरता प्रमुख न राहता एका जागतिक महासत्तेचा प्रमुख म्हणून पाहिला जाऊ लागला. कर्तबगार, विद्वान आणि सभ्य राष्ट्राध्यक्षांची परंपरा आणि अर्थकारण, शिक्षण, संशोधनासाठी अमेरिकेला जगात फार मोठे वजन आहे, हे नाकारता येत नाही. परंतु, वर्तमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जणू ही परंपराच निकालात काढण्याचे ठरविलेले दिसते. कधी ते भारताला मित्र म्हणतात, कधी शत्रू म्हणतात. कधी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात, कधी ते आपले मित्र आहेत, असे म्हणतात. जागतिक पटलावर विविध देशांबद्दल, विविध मुद्यांबद्दलही त्यांची वक्तव्ये कधीच सुसंगत नसतात. काल आपण काय बोललो होतो आणि आज काय बोलतो आहोत, याचा ताळमेळही नसतो. माझ्यासाठी अमेरिका प्रथम आहे, असे त्या देशाच्या राष्ट्राध्यक्षाने म्हणणे व तसे वागणे अयोग्य नाही. परंतु, हा देश महाशक्ती बनविण्यात आपले काहीच योगदान नसताना त्या देशाची परंपरा, प्रतिष्ठा आणि ताकद हे सारे पणाला लावणे गैरच. पण, ट्रम्प यांना टीकाटिप्पणीचे काहीच वाटत नसावे. एवढ्या मोठ्या पदावर एवढा मोठा चक्रमादित्य बसावा हा अमेरिकेच्या भाळी आलेला पीडा योग म्हटला पाहिजे.

सगळी माणसे सारखी नसतात. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षही माणूसच असतो. त्यामुळे प्रत्येक राष्ट्राध्यक्ष वेगळ्या स्वभावाचा असणे स्वाभाविकच आहे. मात्र, प्रेसिडेन्शियल डेकोरम नावाची एक चीज अमेरिकेच्या सत्ता वर्तुळात कायम चर्चेला असते. तिचा अर्थ असा की, वैयक्तिक राग-लोभ, लहरी, स्वार्थ यांच्या पलिकडे जाऊन राष्ट्राध्यक्षांचे सार्वजनिक वर्तन आणि व्यवहार हा सभ्यच असला पाहिजे. पण, ट्रम्प यांना सभ्यतेच्या संकेतांशी जणू काहीही देणेघेणे नाही. भारताला ऑपरेशन सिंदूर थांबविण्यास मीच सांगितले इथपासून ते भारतावर हल्ला झाला तर मीच धावून येईन, इथपर्यंतच्या पुड्या हा चक्रमादित्य सोडत असतो. एका बाजूला चीनशी संधान बांधून भारताची अडवणूक करतो. भारताच्या व्यापारी जहाजांवर अमेरिकेचा हल्ला होतो तेव्हा खलाशांच्या बाबतीत असे घडतच असते, असे ट्रम्प म्हणत असतात. स्वतःच्या मानसिक स्थितीवरच्या प्रश्नावरही ते अद्वातद्वा बोलतात. धादांत खोटी वक्तव्ये, धादांत खोटे दावे करण्यात ते पटाईत आहेत. अशा माणसामुळे अमेरिकेचे जे नुकसान होतेय, ते होतेच आहे. शिवाय, वर्तमान जगातील अस्थिरतेच्या मुळाशी डोनाल्ड ट्रम्प यांचा लहरी स्वभाव आहे. पूर्वीच्या बहुतांशी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी किमान आपल्या शब्दांचा आणि पदाच्या प्रतिष्ठेचा काही तरी विचार केला. त्यांच्या धोरणांबद्दल मतभेद असू शकतात, त्यांच्या निर्णयांवर टीका होऊ शकते; पण त्यांनी आपल्या देशाच्या संस्थांवर, न्यायव्यवस्थेवर, माध्यमांवर किंवा मित्र राष्ट्रांवर सातत्याने संशयाचे सावट निर्माण केले नाही. ट्रम्प यांच्या बाबतीत मात्र परिस्थिती वेगळी आहे. त्यांच्या प्रत्येक वक्तव्यामुळे नवा गोंधळ निर्माण होतो. त्यांनी केलेले विधान हे अमेरिकेचे अधिकृत धोरण आहे, की केवळ त्यांची वैयक्तिक प्रतिक्रिया, याचा उलगडा करण्यासाठी त्यांच्या प्रशासनालाच स्पष्टीकरणे द्यावी लागतात. ही स्थिती एका महासत्तेच्या राष्ट्राध्यक्षाला शोभणारी नाही.

राजकारणात मतभेद असतात, विरोधक असतात. तशीच स्थिती जगातही असते. सारेच एकमेकांचे मित्र नसतात आणि शत्रूही नसतात. लोकशाहीवादी जागतिक व्यवस्थेत अलिखित संकेत असा आहे की, राष्ट्रहिताच्या आणि जागतिक स्थितीच्या (ग्लोबल ऑर्डर) प्रश्नांवर काही प्रमाणात तरी सातत्य असावे. अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात अनेक दशकांपासून काही मूलभूत मुद्दे कायम होते. ट्रम्प यांनी या मुद्यांनाच हादरे दिले. नाटोबद्दल एक भूमिका, युरोपबद्दल दुसरी भूमिका, चीनबद्दल तिसरी भूमिका आणि भारताबद्दल भलतीच भूमिका! त्यातील कोणती भूमिका किती काळ टिकेल, याची खात्री कुणालाच नसते. त्यामुळे अमेरिकेची मित्र राष्ट्रेही संभ्रमात पडतात आणि त्याचे कारण असते त्यांच्या चंचल जिव्हेच्या तऱ्हा!

ट्रम्प यांची शैली ही मुळात राजकारण्यापेक्षा व्यावसायिक सौदेबाजाची आहे. ते व्यावसायिक आहेतच. त्यांनी जबाबदारीच्या पदाच्या संदर्भात व्यावसायिक भूमिका घेऊ नये, अशी अपेक्षा आहे. प्रत्येक प्रश्नाकडे ते व्यवहार म्हणून पाहतात. प्रत्येक संबंध नफा-तोट्याच्या तराजूत मोजतात. जागतिक राजकारण केवळ व्यवहारांवर चालत नाही. त्यात विश्वास, सातत्य, प्रतिमा आणि नैतिक नेतृत्व यांनाही महत्त्व असते. अमेरिका जगात प्रभावशाली बनला तो केवळ त्याच्या लष्करी ताकदीमुळे नव्हे, तर तेथील संस्थांमुळे, विद्यापीठांमुळे, संशोधनामुळे, नवोन्मेषामुळे आणि लोकशाही मूल्यांमुळे. ट्रम्प यांच्या वर्तनामुळे याच अधिष्ठानाला तडा जात असल्याची चिंता अनेक अभ्यासक व्यक्त करतात. ट्रम्प यांच्याबद्दलची टीका केवळ राजकीय विरोधातून होत नाही. त्यांच्या वक्तव्यांमधील विसंगती, तथ्यांकडे होणारे दुर्लक्ष आणि संस्थांत्मक व्यवहाराबद्दलचा अविश्वास यामुळेच ती होते. एखाद्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या विरोधकांवर टीका करणे समजू शकते. पण न्यायालये, निवडणूक प्रक्रिया, विद्यापीठे, पत्रकार आणि अगदी स्वतःच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवरही सतत संशय व्यक्त करणे विचित्र वाटते. भारताच्या दृष्टीने पाहिले तरी ट्रम्प हे कोडेच आहेत. एका बाजूला ते भारताचे कौतुक करतात, पंतप्रधान मोदी यांच्याशी मैत्रीचे संबंध असल्याचे सांगतात; तर दुसऱ्या बाजूला व्यापार, शुल्क, स्थलांतर किंवा आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे भारताने त्यांच्या जिव्हा चंचलतेपेक्षा कृतीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.donald trump राष्ट्रांमधील संबंध हे व्यक्तींच्या मैत्रीवर नव्हे, तर परस्पर हितसंबंधांवर टिकून असतात हे खरेच. त्यामुळे प्रत्येक राष्ट्रप्रमुखाने आपल्या देशाचे हितसंबंध जपण्यात गैर नाही. मात्र, इतरांना त्रास होईल, असेही कुणी वागू नये. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे एक वाक्यही बाजारपेठा आणि जागतिक व्यवस्था अस्थिर करणारे ठरते. अशा परिस्थितीत ट्रम्प यांच्याकडून संयमित भाषा, विचारपूर्वक प्रतिक्रिया आणि जबाबदार संवाद ही अपेक्षा अवास्तव नाही. परंतु, ट्रम्प यांच्या बाबतीत अनेकदा याच्या नेमके उलट चित्र दिसते. सामाजिक माध्यमांवरील त्यांच्या प्रतिक्रिया, पत्रकार परिषदांतील त्यांची भाषा आणि राजकीय प्रतिस्पर्ध्यांवरील त्यांचे हल्ले एखाद्या राष्ट्राध्यक्षापेक्षा प्रचारसभेत भाषण देत असलेल्या उमेदवारासारखे वाटतात. कोणत्याही राष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीच्या स्वभावात गांभीर्य आणि स्थैर्य अपेक्षित असते. ट्रम्प यांच्या नेतृत्वाबद्दलचा सर्वात मोठा आक्षेप हाच आहे की, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनिश्चितता आणि चंचलता ही अमेरिकेसारख्या महासत्तेसाठी आणि जगासाठीही धोक्याची ठरू शकते. जग आधीच युद्धे, आर्थिक संकटे, दहशतवाद, हवामान बदल आणि भू-राजकीय संघर्षांनी त्रस्त आहे. अशा वेळी जगाला स्थिर चित्त असलेल्या नेत्यांची गरज आहे. लहरी लोकांची नव्हे. अमेरिका हा जागतिक व्यवस्थेतील महत्त्वाचा स्तंभ आहे. त्या स्तंभाच्या शिखरावर बसलेल्या व्यक्तीच्या प्रत्येक शब्दाला वजन असते. त्यामुळेच ट्रम्प यांची चंचल जिव्हा आणि लहरी स्वभाव यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली जाते. व्यक्ती कितीही लोकप्रिय असो, ती तिच्या पदापेक्षा मोठी नसते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षीय परंपरेच्या तुलनेत पाहिले तर ट्रम्प यांची कारकीर्द अनेकदा अपवादापेक्षा अपघातासारखी अधिक भासते. जगातील सर्वांत शक्तिशाली खुर्चीवर बसलेल्या या चक्रमादित्याच्या प्रत्येक नव्या वक्तव्याकडे जग आश्चर्य, कुतूहल आणि काळजीने पाहत असते. अमेरिका आणि आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हाती सध्या तरी तेवढेच आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur