Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चंद्रपुरातील सखल वस्त्यांमध्ये शिरले पुराचे पाणी

चंद्रपुरातील सखल वस्त्यांमध्ये शिरले पुराचे पाणी

चंद्रपूर,

Floodwaters-enter-settlements : जिल्ह्यात तीन दिवस आलेल्या सततच्या पावसामुळे वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली. वर्धेच्या 'बॅक वॉटर'ने इरई नदीही फुगली. परिणामी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चंद्रपूर शहराच्या बाह्य भागातील बिनबा गेट, रहमत नगर आणि परिसरातील अनेक सखल वस्त्यांमध्ये इरईचे पाणी शिरले.

संभाव्य धोका लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने रहमत नगर परिसरातून 30 नागरिकांचे स्थलांतरण केले. तसेच पुरात अडकलेल्या 3 जणांना बचाव पथकाने वाचवले.

पुराचे पाणी घरात शिरल्याने रहमतनगर परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील नागरिकांना सुरक्षितरित्या आणण्यासाठी महानगरपालिकेमार्फत आवश्यक वाहनांची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर सर्व नागरिकांना शाळेमध्ये तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात आला. तसेच, स्थलांतरित नागरिकांच्या राहण्याची, भोजनाची, पिण्याच्या पाण्याची तसेच इतर आवश्यक मूलभूत सुविधांची व्यवस्था करण्यात आली.

तसेच आरवट गावातील सहारा पार्क येथील निवासी भागातील घरामध्ये पुराचे पाणी शिरल्याने येथील 40 कुटुंबाला सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. महानगरपालिका प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे व आवश्यकतेनुसार प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

पुरामुळे चारवट-माना-चंद्रपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. हडस्ती-चारवट गावठाणपर्यंत पुराचे पाणी पोहचले. तसेच आरवट ते पठाणपुरा, बिनबा ते चोराडा, हिंगनाळा ते मारडा, आरवट ते शिवनी चोर मार्ग पुराच्या पाण्यामुळे बंद झाले.

वर्धा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेता राजुरा-बामणी (बल्लारपूर) रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग राजुरा सास्ती मार्गे बल्लारपूर रस्ता वाहतुकीसाठी सुरू आहे. अवजड वाहने व माल वाहतूक सकाळपर्यंत थांबवून ठेवण्यात आली. त्यांच्याकरिता बायपासवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. शनिवारी पांढरकवडा ते वढा, आरवट ते शिवनीचोर, वढा ते उसगाव, पिपरी ते वेंढली, धानोरा ते भोयगाव, हिंगनाळा ते मारडा, आरवट ते पठाणपूरा, चोराळा ते बिनाबा गेट, पांढरकवडा ते उसगाव या मार्गावरील वाहतूक ठप्प होती.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur