Dailyhunt
चारधाम यात्रेत बनावट बुकिंगचा विळखा

चारधाम यात्रेत बनावट बुकिंगचा विळखा

नवी दिल्ली,

Fake bookings in Chardham Yatra चारधाम यात्रेला २०२६ मध्ये सुरुवात होताच केदारनाथसह प्रमुख तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टर सेवांच्या तिकिटांना प्रचंड मागणी वाढली आहे.

मात्र या वाढत्या गर्दीचा फायदा घेत फसवणुकीचे प्रकारही समोर येऊ लागले असून यात्रेकरूंना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.प्रशासन आणि सायबर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, काही बनावट संकेतस्थळे, समाजमाध्यमांवरील जाहिराती तसेच संदेशसेवा गटांच्या माध्यमातून हेलिकॉप्टर तिकिटांच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केवळ अधिकृत मार्गांचा वापर करूनच बुकिंग करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

सरकारी व्यवस्थेनुसार चारधाम यात्रेसाठी नोंदणी प्रक्रिया स्वतंत्र पोर्टलवर पूर्ण करावी लागते. त्यानंतर केदारनाथसाठी हेलिकॉप्टर तिकिटे अधिकृत प्रवास व्यवस्थापन संकेतस्थळावरूनच उपलब्ध करून देण्यात येतात. कोणत्याही मध्यस्थ किंवा अनधिकृत संकेतस्थळावर विश्वास ठेवू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.बुकिंग प्रक्रियेत प्रथम नोंदणी करणे आवश्यक असून ओळखपत्र आणि मोबाईल क्रमांकाच्या आधारे प्रवासी तपशील पडताळला जातो. त्यानंतर प्रवासाचा मार्ग, तारीख आणि वेळ निवडून तिकिट निश्चित केले जाते. पेमेंट केवळ अधिकृत डिजिटल माध्यमातूनच स्वीकारले जाते, तर संशयास्पद लिंक किंवा वैयक्तिक क्यूआर कोडद्वारे पैसे पाठवू नयेत, असा इशारा देण्यात आला आहे.

अलीकडच्या काळात अनेक प्रवाशांची बनावट कॉल सेंटर्स आणि खोट्या संकेतस्थळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये व्हीआयपी दर्शन किंवा हमखास तिकीट मिळवून देण्याचे आमिष दाखवून हजारो रुपयांची फसवणूक झाल्याचेही उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने यात्रेकरूंना अत्यंत काळजीपूर्वक आणि अधिकृत स्रोतांद्वारेच बुकिंग करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून श्रद्धेच्या या प्रवासात कोणताही अनुचित प्रकार घडू नये.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur