Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चिखली उपजिल्हा रुग्णालयाच्या दुप्पट श्रेणीवर्धनाला मंजुरी

चिखली उपजिल्हा रुग्णालयाच्या दुप्पट श्रेणीवर्धनाला मंजुरी

चिखली,

Chikhali-sub-district-hospital : चिखली येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्याच्या बहुप्रतिक्षित मागणीला अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला असून, चिखली विधानसभा मतदारसंघासाठी ही मोठी आरोग्यविषयक उपलब्धी मानली जात आहे.

या महत्त्वपूर्ण निर्णयामागे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील यांनी केलेला सातत्यपूर्ण आणि बहुआयामी पाठपुरावा निर्णायक ठरला आहे. विधानसभेच्या अधिवेशनात त्यांनी वारंवार हा विषय उपस्थित केला होता. तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय स्तरावरील बैठका आणि प्रत्यक्ष मंत्रीस्तरीय चर्चांमधून त्यांनी या मागणीचा सातत्याने आग्रह धरला होता.

चिखली आणि परिसरातील वाढती लोकसंख्या, अपघातांचे वाढते प्रमाण, ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या आणि बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य सुविधांवरील ताण लक्षात घेता, चिखली येथे १०० खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय होणे ही काळाची गरज असल्याचे आमदार श्वेता महाले पाटील यांनी वेळोवेळी शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते.

या मागणीची दखल घेत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि संबंधित विभागाला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या विषयात विशेष लक्ष घालून प्रशासकीय स्तरावर आवश्यक समन्वय साधत या प्रस्तावाला गती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विशेष हस्तक्षेपामुळे हा महत्त्वाचा निर्णय मार्गी लागल्याची भावना स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.

शासन निर्णयानुसार आता श्रेणीवर्धित रुग्णालयासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे, इमारत बांधकाम, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदनिर्मितीची प्रक्रिया स्वतंत्रपणे राबविण्यात येणार आहे. यामुळे चिखलीसह परिसरातील हजारो रुग्णांना अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे.

या निर्णयामुळे माता-बाल आरोग्य, आपत्कालीन सेवा, शस्त्रक्रिया, अतिदक्षता उपचार आणि विविध तज्ज्ञ वैद्यकीय सेवा चिखलीतच उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या ऐतिहासिक निर्णयाबद्दल आमदार श्वेता महाले पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे आभार मानले असून, चिखली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपला प्रयत्न यापुढेही सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे...

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur