Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'दैवी शक्ती'च्या नावाखाली लाखोंची फसवणूक?

'दैवी शक्ती'च्या नावाखाली लाखोंची फसवणूक?

मुंबई

Ashok kharat 'दैवी शक्ती' आणि चमत्कारिक लाभांचे आमिष दाखवत भक्तांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) धक्कादायक माहिती न्यायालयासमोर सादर केली आहे.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासात अशोक खरातने सामान्य वस्तू आणि दागिने अलौकिक शक्ती असल्याचा दावा करत अव्वाच्या सव्वा किमतीत विकल्याचे पुरावे समोर आल्याचे ईडीने म्हटले आहे.

ईडीच्या माहितीनुसार, जवळपास 1 हजार रुपये किमतीच्या पुष्कराज आणि डायमंडसदृश अंगठ्यांची जोडी अशोक खरातने भक्तांना तब्बल 2 लाख 62 हजार रुपयांना विकली होती. या अंगठ्यांमुळे आर्थिक संकट दूर होईल, व्यवसायात भरभराट होईल आणि दैवी शक्ती प्राप्त होतील, असे दावे करून त्यांची विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे.

याशिवाय इतर अनेक वस्तूही अलौकिक शक्ती आणि चमत्कारिक फायदे मिळतील, असे सांगून मोठ्या रकमेत विकण्यात आल्याचे ईडीच्या तपासात नमूद करण्यात आले आहे. चिंचेच्या बिया सुमारे 100 रुपये प्रति किलो दराने खरेदी करून त्या 10 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत विकल्याचे तपासातून समोर आले आहे.तसेच बाजारात 300 ते 500 रुपये प्रति लिटर दराने मिळणारा मध 'दैवी मध' म्हणून तब्बल 7 लाख रुपये प्रति लिटर दराने विकण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे. सामान्य रत्नांना ग्रहदोष दूर करणारी आणि यश मिळवून देणारी 'ऊर्जित' रत्ने म्हणून लाखो रुपयांना विकण्यात आल्याचेही तपासात आढळून आले आहे.या व्यवहारातून मिळालेला पैसा विविध बँक खात्यांमधून फिरवून त्याचा मूळ स्रोत लपविण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या अंगठ्यांचे मूल्यांकन केल्यानंतर त्या साध्या आणि नकली दागिन्यांच्या स्वरूपातील असल्याचे समोर आल्याचेही ईडीने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये म्हटले आहे.ईडीने हा संपूर्ण प्रकार संघटित आर्थिक फसवणुकीचा भाग ashok kharat असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, समता नागरी सहकारी पतसंस्थेतील बनावट खात्यांच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुख्य आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहाता शहरातील शाखेत बनावट खाती उघडून आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी अशोक खरातला अटक केली होती. त्यानंतर भोंदूबाबाला पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले असता, आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासासाठी ईडीने त्याच्या कोठडीची मागणी केली होती.

अशोक खरातविरोधात महिला लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी आठ गुन्हे दाखल आहेत. अनेकांना आर्थिक आमिष दाखवून फसवणूक केल्याचा तसेच शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाचा तपास ईडीच्या विशेष पथकाकडून सुरू असून, पुढील तपासात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur