ऊन सावली
गिरीश प्रभुणे
हमे वीर केशव
मिले आप जबसे
नई साधना की
डगर मिल गयी है...
डगर मिल गयी... डॉक्टरांनी निर्माण केलेली अतिसुक्ष्म लहरींची भारतीय राष्ट्रवादाची दुर्बिण...! यातून पाहू लागलं की, सारा भारत एका वेगळ्या चैतन्याने भारलेला दिसू लागतो. ख-या भारताचा शोध आपल्याला लागतो. कोलंबस युरोपातून भारत शोधयात्रेला निघाला. केवढी तयारी. मोठं कर्ज उभारणी सा-या युरोपातून उत्सुकता; समुद्रमार्गे यापूर्वी कोणीच गेला नव्हता. भारताकडे सारा व्यापार भूमार्गेच रेशिम मार्गावरूनच चाले. पण तो मार्ग आता अफगाणी मुसलमानांनी पूर्ण कब्जा केलेला. कोलंबसची भारत शोधयात्रा ही युरोपला नवचैतन्य देणारी ठरली. अनेक छोट्या-मोठ्या देशांनी अशा शोधयात्रा राबविल्या. संकटे झेलीत शिडाच्या जहाजातून जीव धोक्यात घालून या शोधयात्रा का राबविल्या...? अफगाणांच्या आधी सिकंदर, शक, हूण, कुषाण अशांनी असंख्य वेळा आक्रमण केलं. प्रचंड लूट नेली. मोगलांंनी तर सारी नाकेबंदी करून चार-पाचशे वर्षे दिल्लीवर राज्यच केलं. हे सर्व भारताकडे का येत होते? याच इंग्रजांनी जो इतिहास लिहिला, तो आम्ही कसे दरिद्री, भिकारी, अडाणी, अंधश्रद्धा जोपासणारे. विषमतेचा अर्क आम्हाला संस्कृती नाही. आमच्यात एका राष्ट्रीयत्वाची भावना नाही. आमच्या भाषा मागासलेल्या. आमच्याकडे विज्ञानाचा अंश नाही. शिक्षणाचा गंध नाही. असं सर्व बाजूंनी मागासलेले खुरटे लोक भारतीय. पहिल्या गोलमेज परिषदेत गव्हर्नरने अशी दर्पोक्ती उच्चारली. महात्मा गांधींनी त्यांना अडवत म्हटले, ''इंग्रज आल्यानंतर भारत अडाणी होत गेला. इंग्रज येण्यापूर्वी भारत सर्वच अंंगाने समृद्ध होता.''
खरं तर भारताच्या असंस्कृत मागासलेपणाचं वर्णन हे युरोपियनांना लागू पडतं. बाराव्या शतकापर्यंत युरोप अत्यंत मागासलेला होता तर भारतात तक्षशिला-नालंदासारखी शंभरेक विश्वविद्यालये होती. परंतु याचे पुरावे मिळत नव्हते. मोहोंजोदारो-हडप्पा- अजंठा-वेरूळ याच्या दर्शनाने स्तिमित झालेल्या पाश्चात्त्य विचारवंतांनी त्याचाही उपयोग इतिहासाचे विकृतीकरण करण्यासाठीच केला. धर्मपालजी म. गांधींचे अनुयाई. ऐन तारुण्यात स्वातंत्र्य चळवळीत उतरले. अनेक प्रकारच्या ग्रामविकासाच्या प्रत्यक्ष प्रयोगात मीरा बेनबराबर त्यांनीही काही वर्षे कामही केले. इस्रायलचे प्रयोग प्रत्यक्ष जाऊन अनुभवले. यानंतर मात्र दहा-बारा वर्षे इंग्लंडमध्ये राहून त्यांनी भारताचा शोध घेतला. लाखो कागदपत्रं हाताळून वाचून नकळून आणून १७-१८ आणि १९व्या शतकातील भारत कसा होता, हे त्यांनी सप्रमाण जगाला दाखवून दिले. हे त्याचं संशोधन, त्याकरिता घेतलेले श्रम हे अचंबित करणारे आहेत.

