Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एसटीच्या 'स्मार्ट कार्ड'ला प्रवाशांची पसंती!

एसटीच्या 'स्मार्ट कार्ड'ला प्रवाशांची पसंती!

मुंबई,

St-ncmc-card : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) या महत्त्वाकांक्षी योजनेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. डिजिटल प्रवास व्यवस्थेला गती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजने अंतर्गत आतापर्यंत तब्बल ६२ लाख ८६ हजार ७६५ प्रवाशांनी स्मार्ट कार्डसाठी आपली नोंदणी पूर्ण केली आहे.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नोंदणीकृत प्रवाशांपैकी ३५ लाख ५२ हजार ३३२ प्रवाशांची कार्डे आधीच सक्रिय करण्यात आली आहेत.

१ ऑगस्ट २०२६ पासून 'या' प्रवाशांना स्मार्ट कार्ड बंधनकारक

परिवहन विभागाने डिजिटल प्रवासाला अधिक सक्षम करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आगामी १ ऑगस्ट २०२६ पासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक या प्रवर्गातील प्रवाशांसाठी प्रवास सवलतीचा लाभ घेण्यासाठी हे NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य असणार आहे. त्यामुळे ज्या सवलतधारक प्रवाशांनी अजूनही आपली नोंदणी केलेली नाही, त्यांनी तात्काळ जवळच्या अधिकृत नोंदणी केंद्रावर जाऊन आपले स्मार्ट कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन परिवहन मंत्र्यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगर प्रदेश संपूर्ण राज्यात अव्वल

या डिजिटल कार्डच्या अंमलबजावणीमध्ये छत्रपती संभाजीनगर प्रदेशाने बाजी मारत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या प्रदेशात एकूण १५ लाख ९३ हजार २५६ प्रवाशांनी नोंदणी केली असून, त्यातील ८ लाख ८६ हजार ४७३ कार्डे सक्रिय झाली आहेत. या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर पुणे प्रदेश (१४ लाख ७१ हजार ४३६ नोंदण्या) तर तिसऱ्या क्रमांकावर नाशिक प्रदेश (१४ लाख ३८ हजार ६९ नोंदण्या) राहिला आहे.

जळगाव विभागाची कामगिरी सर्वात दमदार

जर स्वतंत्र जिल्ह्यांच्या किंवा विभागांच्या पातळीवर पाहिले, तर जळगाव विभागाने सर्वाधिक ४ लाख ६३ हजार २३० नोंदण्या करून राज्यात पहिले स्थान मिळवले आहे. जळगावपाठोपाठ अहिल्यानगर (३.९५ लाख), सातारा (३.४८ लाख), सोलापूर (३.४२ लाख), बुलढाणा (३.३१ लाख) आणि बीड (३.२७ लाख) या विभागांनीही उल्लेखनीय आणि कौतुकास्पद कामगिरी नोंदवली आहे.

'वन नेशन, वन कार्ड'चे स्वप्न होणार साकार

एसटी महामंडळाची तिकीट प्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि हायटेक करण्यासाठी 'वन नेशन, वन कार्ड' ही संकल्पना राबवली जात आहे. ज्या प्रवाशांची नोंदणी झाली आहे परंतु कार्ड सक्रिय झालेले नाही, त्यांच्यासाठी एसटी महामंडळ लवकरच एक विशेष मोहीम हाती घेणार आहे. राज्यातील प्रत्येक पात्र प्रवाशापर्यंत हे स्मार्ट कार्ड पोहोचवून डिजिटल आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याचा निर्धार महामंडळाने केला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur