Dailyhunt
गडचिरोलीत नीट परीक्षेत एआयचा वापर

गडचिरोलीत नीट परीक्षेत एआयचा वापर

गडचिरोली,

Use of AI in NEET exam in Gadchiroli गडचिरोली येथे वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या परीक्षेत हायटेक प्रकारच्या गैरप्रकाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

शहरातील दोन परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर करून परीक्षेत फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, परीक्षेदरम्यान कडक तपासणी असूनही दोन विद्यार्थ्यांनी मोबाईल लपवून केंद्रात प्रवेश मिळवला. एका केंद्रावर एका विद्यार्थिनीच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर तपासणी करण्यात आली असता तिच्याकडे मोबाईल सापडला. तिच्याकडून उत्तरपत्रिकेशी संबंधित काही साहित्यही आढळून आले असून तिने पूर्वतयारी करून फसवणुकीचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

दुसऱ्या केंद्रावर एका विद्यार्थ्याला मोबाईलसह पकडण्यात आले. तपासणीदरम्यान त्याच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटो आणि संवाद तपासल्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने उत्तरे मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे परीक्षा पद्धतीच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.परीक्षेच्या वेळी चप्पल, दागिने आणि इतर साध्या वस्तूंनाही बंदी असतानाही मोबाईल आत कसा गेला, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकारानंतर परीक्षा केंद्रातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकरणी केंद्रप्रमुखांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून संबंधित दोन्ही विद्यार्थ्यांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी मोबाईल आणि इतर पुरावे जप्त केले असून या गैरप्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur