विजय माहुरे
सेलू,
Industrial development बागायती तालुका म्हणून ओळखल्या जात असलेल्या सेलू तालुक्यात गावांचा विकास होत असला तरी रोजगाराच्या संधीसाठी औद्योगिक विकासाचे काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
सेलू हा ओलिताची शेती असलेला तालुका आहे. तालुक्यातून समृद्धी व तुळजापूर महामार्ग गेला. यासाठी शेकडो एकर बागायती शेती अधिग्रहीत करण्यात आली. आता नलगंगा प्रकल्प याच तालुक्यातून जात आहे, यातही शेकडो एकर शेतजमीन जाणार आहे. पण, तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न कित्येक वर्षांपासून भेडसावत आहे.
महामार्ग गुळगुळीत होत असताना पांदण रस्ते जैसे थे आहे. आता शासनाने पांदण रस्त्यांकडे लक्ष दिले आहे. गावागावात लाखो रुपयांचा शासन निधी विविध कामावर खर्च केला जात आहे. जनतेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी युवा पिढीला रोजगार मिळणे गरजेचे आहे. पण एकाही लोकप्रतिनिधींनी तालुक्यात औद्योगिक वसाहतीचे स्वप्न पूर्ण केले नाही.
केळीच्या बागा, संत्रा आणि कापूस मोठ्या प्रमाणात या तालुक्यात होत असताना शेती पिकावर आधारित उद्योग उभे राहिले नाही. सेलू तालुक्यात ११० गावांचा समावेश आहे. एक नगरपालिका, एक नगर पंचायतचा समावेश आहे. शेती व्यवसाय महागडा खर्च व शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने डबघाईस आला आहे. दुग्ध व्यवसायाकडे ग्रामीण भागात पाठ फिरविली जात आहे. शेळी व कुकूट पालन दिसेनासे झाले आहे. अशास्थितीत सुशिक्षित बेरोजगार व्यवसायाच्या शोधात असताना घरपोच ऑनलाइन सेवेमुळे बाजारपेठा ओस पडल्या आहेत.
तरुणांच्या हाताला काम नाही, त्यासाठी गावाचा विकास हा नावापुरता राहिला आहे. त्यामुळे सेलू तालुयातील बेरोजगारांना नोकरी करण्यासाठी बुटीबोरी, नागपूर येथे जावे लागत आहे.industrial development सेलू परिसरात औद्योगिक वसाहतीसाठी पुढाकार घेतल्यास संपन्न तालुका होण्यास मदत होईल व बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यत केली जात आहे.
गत १० वर्षांत आमदार ते राज्यमंत्री म्हणून डॉ. पंकज भोयर यांनी मतदारसंघाचा केलेला विकास व विकासाचा घेतलेला ध्यास पाहता तालुक्यातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहे. युवकांची फौज त्यांच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहे. सेलू तालुक्यात औद्योगिक वसाहत निर्माण झाल्यास युवकांचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. विकासात भर म्हणून राज्यमंत्री डॉ. भोयर तालुक्यात औद्योगिक वसाहतीसाठी पुढाकार घेईल, अशी अपेक्षा व्यत केली जात आहे.

