Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'जयंती २' ११ सप्टेंबरला महाराष्ट्रभर प्रदर्शन

'जयंती २' ११ सप्टेंबरला महाराष्ट्रभर प्रदर्शन

मुंबई

Jayanti 2 अनेक कायदे आणि नियम अस्तित्वात असतानाही महाविद्यालयांमध्ये रॅगिंग आणि भेदभावाच्या घटना आजही घडताना दिसतात. विशेषतः अनुसूचित जाती-जमातींच्या विद्यार्थ्यांना अनेकदा जातीआधारित रॅगिंग आणि छळाला सामोरे जावे लागते.

याच गंभीर वास्तवावर भाष्य करणारा 'जयंती २' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून, कॉलेजमधील रॅगिंग, भेदभाव आणि त्यातून उभ्या राहणाऱ्या संघर्षाची तीव्रता ट्रेलरमधून पाहायला मिळते. हा चित्रपट येत्या ११ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

चंद्रपूरसारख्या भागातून उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या पायल या तरुणीची कथा 'जयंती २'मध्ये मांडण्यात आली आहे. उच्च शिक्षण घेऊन शेती करण्याचे स्वप्न पायलने उराशी बाळगले आहे. मात्र, कॉलेजमध्ये दाखल झाल्यानंतर तिच्या वाट्याला रॅगिंगचा त्रास येतो. या अन्यायाला विरोध केल्यानंतर त्यातून संघर्ष उभा राहतो. या संघर्षात पायलचे पुढे काय होते, तिला न्याय मिळतो का, याची कथा चित्रपटातून उलगडण्यात आली आहे.मात्र, 'जयंती २' केवळ पायलच्या संघर्षाची गोष्ट सांगणारा चित्रपट नाही. तिच्या अनुभवाच्या निमित्ताने कॉलेज प्रशासनाचा दृष्टिकोन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून मिळणारी वागणूक तसेच शिक्षण व्यवस्थेतील भेदभावाचे विविध पदर चित्रपटातून समोर आणले आहेत. आधुनिकतेच्या काळातही समाजात आणि शिक्षणाच्या क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या भेदभावावर चित्रपट भाष्य करतो आणि या वास्तवाबाबत काही नवे प्रश्नही उपस्थित करतो.'जयंती २'ची निर्मिती मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओने केली आहे. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन शैलेश बळीराम नरवाडे यांचे आहे. 'जयंती' चित्रपटाचा प्रमुख चेहरा ठरलेला अभिनेता ऋतुराज वानखेडे यामध्ये मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. त्याच्यासोबत पायल जाधव, अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे आणि मानसी सुभाष अशी दमदार कलाकारांची फौज या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.चित्रपटासाठी संजीवकुमार हिल्ली यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून, संकलनाची जबाबदारी फैसल महाडिक यांनी सांभाळली आहे. डॉ. सुहास अंबादे, सुहास मुंडे आणि सौरभ गुरू यांनी लिहिलेल्या गीतांना ओंकारस्वररूप यांचे संगीत लाभले आहे. तर चित्रपटाचे पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांनी दिले आहे.'जयंती २'चा ट्रेलर प्रभावी ठरला jayanti 2 असून, त्यातून पायलच्या वाट्याला येणारा भेदभाव आणि त्याविरोधात उभा राहणाऱ्या संघर्षाची झलक पाहायला मिळते. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच त्याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जयंती' या चित्रपटाने मोठी चर्चा घडवून आणली होती. आता त्यापुढे जात 'जयंती २'ने शिक्षण क्षेत्रातील भेदभाव आणि त्यामागील राजकारणाला कथानकाच्या केंद्रस्थानी आणले आहे. उत्तम कथानकाला कसदार अभिनेत्यांची जोड मिळाल्याने या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur