Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जि.प.शाळांमध्ये पोषण आहार ठप्प

जि.प.शाळांमध्ये पोषण आहार ठप्प

कारंजा लाड,

Zilla parishad schools विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढविण्यासोबतच कुपोषणाला आळा घालण्यासाठी राबविण्यात येणार्‍या 'प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण' योजनेला कारंजा तालुयात पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा फटका बसला आहे.

तालुयातील सुमारे ९० टक्के जिल्हा परिषद शाळांमध्ये तांदूळ, डाळी व अन्य धान्यादी साहित्याचा साठा संपल्याने मागील महिनाभरापासून विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नसल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.

मागील काही महिन्यांपासून प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक शाळांना पोषण आहारासाठी आवश्यक असलेल्या तांदळासह डाळी, तेल आणि अन्य साहित्याचा नियमित पुरवठा होत नसल्याची तक्रार आहे. उपलब्ध साठा संपल्यानंतर काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचा आहार बंद पडू नये म्हणून स्वस्त धान्य दुकान, इतर शाळा अथवा अंगणवाड्यांकडून तांदूळ व धान्य उसनवारीवर घेऊन व्यवस्था सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा पर्यायी साठाही संपल्याने अनेक शाळांमध्ये चुली थंड पडल्या आहेत.शाळा स्तरावरून पोषण आहारासाठी साहित्य उपलब्ध नसल्याची बाब पंचायत समिती प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

मात्र, त्यानंतरही नियमित पुरवठा पूर्ववत झालेला नसल्याची तक्रार पालक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांकडून होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील विद्यार्थ्यांसाठी शाळेत मिळणारा पोषण आहार हा केवळ पूरक आहार नसून त्यांच्या दैनंदिन पोषणाचा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे आहार बंद राहिल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर तसेच शाळेतील उपस्थितीवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.शाळेतील विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार मिळणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित बाब आहे. शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा उद्देशच विद्यार्थ्यांना शाळेत पौष्टिक आहार उपलब्ध करून देणे हा असताना पुरवठ्याअभावी योजना ठप्प होणे ही गंभीर बाब असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि संबंधित पुरवठा यंत्रणेने तातडीने दखल घेऊन कारंजा तालुयातील शाळांना तांदूळ, डाळी, तेल तसेच आवश्यक धान्यादी साहित्याचा नियमित पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. पोषण आहाराअभावी विद्यार्थ्यांच्या ताटातील 'खिचडी' पुन्हा कधी शिजणार, याकडे पालक, विद्यार्थी आणि शाळा व्यवस्थापन समित्यांचे लक्ष लागले आहे.

सोमवारपासून पोषण आहार वाटप

पोषण आहाराचा मागील करार संपल्याने आणि त्यानंतरच्या करारास वरिष्ठ स्तरावरून विलंब झाल्याने पोषण आहाराचा तुटवडा निर्माण झाला. परंतु सोमवार पर्यंत नवीन करार होऊन शाळांना पोषण आहार वितरित केल्या जाईल.

श्रीकांत माने गटशिक्षणाधिकारी

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur