एडमंटन,
Knife attack inside a Gurudwara in Canada कॅनडातील एडमंटन येथे असलेल्या नानकसर गुरुद्वारात शुक्रवारी सकाळी अचानक एक धक्कादायक घटना घडली. एका अज्ञात इसमाने गुरुद्वारात घुसून प्रार्थनास्थळाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला.
तेथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात तीव्र झटापट झाली. या दरम्यान त्या इसमाने तेथे उपस्थित दोन भाविकांवर चाकूने हल्ला केला, ज्यामध्ये ७५ वर्षीय आणि ५१ वर्षीय दोन पुरुष जखमी झाले. सध्या या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी या घडलेल्या संपूर्ण प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध करत याला अत्यंत भयानक घटना म्हटले आहे.
एडमंटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेच्या वेळी तेथे असलेल्या लोकांनी प्रसंगावधान राखून तत्परतेने त्या हल्लोखोराला पकडून ठेवले, ज्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला आणि परिस्थिती नियंत्रणात आली. पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे की या २७ वर्षीय आरोपीचा २०१५ पासूनच हिंसक गुन्ह्यांचा इतिहास राहिला आहे. विशेष म्हणजे, या हल्ल्याच्या अवघ्या एका दिवसानंतर त्याची अल्बर्टा येथील फेडरल तुरुंगातून सुटका होणार होती आणि त्याला एडमंटन येथील एका निश्चित पुनर्वसन केंद्रात तातडीने दाखल केले जाणार होते; परंतु तो तिथे पोहोचलाच नाही. हा हल्ला चिथावणीखोर वक्तव्ये किंवा शीखविरोधी द्वेषपूर्ण विचारसरणीतून प्रेरित होऊन करण्यात आला होता का, या दृष्टीने पोलीस सध्या कसून तपास करत आहेत. दुसरीकडे, जागतिक शीख संघटनेने या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तसेच हल्ल्याच्या वेळी गुरुद्वारातील पवित्र शीख धर्मग्रंथांची नासधूस झाल्याचा दावाही संघटनेने केला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सध्या गुरुद्वारा परिसर लोकांसाठी तात्पुरता बंद ठेवला असून पुढील तपास सुरू आहे.
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी या हिंसक हल्ल्याचा तीव्र शब्दांत धिक्कार करत जखमी नागरिक आणि पीडित शीख समुदायाप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. कॅनडामध्ये शीख धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी देखील व्हँकुव्हरमधील एका गुरुद्वाराची खलिस्तान समर्थकांकडून तोडफोड करण्यात आली होती आणि भिंतींवर विसंगत घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यावेळी 'खालसा दीवान सोसायटीने' निवेदनाद्वारे अशा विभाजनकारी घोषणा पवित्र स्थळांचा अपमान असल्याचे सांगत निषेध नोंदवला होता.

