रावलकोट,
Allegation by Awami Action Committee पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या २४ व्या दिवशी पाकिस्तानविरोधातील संताप आणखी तीव्र झाला आहे. रावळकोट येथील ईदगाह मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान अवामी ॲक्शन कमिटीच्या नेत्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणावर गंभीर आरोप करत मोठा खुलासा केला.
आंदोलनाचे नेतृत्व करणारे सरदार अमन खान यांनी थेट आरोप केला की, पाकिस्तानी सैन्यानेच काश्मिरींच्या हातात बंदुका दिल्या आणि आता त्यांनाच दहशतवादी ठरवले जात आहे. सरदार अमन खान यांनी पाकिस्तान सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका करत सांगितले की, आंदोलनात सहभागी असलेल्या नागरिकांना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ९ जूनपासून अवामी ॲक्शन कमिटी आणि तिच्याशी संबंधित सुमारे १५० जणांना दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना खान म्हणाले की, ज्यांनी शस्त्रे दिली तेच आता आम्हाला दहशतवादी म्हणत आहेत.
जैश-ए-मोहम्मदच्या रॅलीचाही उल्लेख
रावळकोटमधील सभेत बोलताना अमन खान यांनी गेल्या वर्षी ५ फेब्रुवारीला झालेल्या जैश-ए-मोहम्मदच्या रॅलीचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, त्या वेळी दहशतवादी तलवारी आणि एके-४७ घेऊन उघडपणे रस्त्यावर उतरले होते आणि भारताविरोधात धमक्या देत होते. अशा घटनांना प्रशासनाचे मौन समर्थन असल्याचा आरोपही त्यांनी केला.अमन खान यांनी रावळकोटच्या उपायुक्तांवरही थेट निशाणा साधला. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, बंदुका आणि तलवारींसह रॅलींना परवानगी देणारे प्रशासन आज शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांना दहशतवादी कसे ठरवू शकते? त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, आंदोलनात सहभागी सर्व लोक या भूमीचे मूळ वारसदार आहेत.
कव्याप्त काश्मीर रिकामे करा
ईदगाह मैदानावर जमलेल्या आंदोलकांनी पुन्हा एकदा पाकिस्तान सरकारला इशारा दिला की, पाकव्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भाग नसून काश्मिरी जनतेच्या हक्कांचा प्रदेश आहे. अमन खान म्हणाले की, काश्मिरींना गुलाम बनवण्याचे पाकिस्तानचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. त्यांच्या मते, ना पूर्वज गुलाम होते, ना आजची पिढी आहे आणि भविष्यातील पिढ्याही गुलाम होणार नाहीत.आंदोलकांनी पाकिस्तान सरकारसमोर ठाम भूमिका मांडत सांगितले की, त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी संवाद हाच एकमेव मार्ग आहे. अन्यथा, पाकव्याप्त काश्मीरमधील विविध शहरांतून रावळकोटमध्ये जमलेले ८० हजार आंदोलक मुझफ्फराबादकडे कूच करतील. तसे झाल्यास हा संघर्ष केवळ ३८ मागण्यांपुरता मर्यादित राहणार नाही, तर पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीर रिकामे करण्याची मागणी अधिक तीव्र होईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.

