Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कीववर क्षेपणास्त्रांचा वर्षाव; ९ ठार

कीववर क्षेपणास्त्रांचा वर्षाव; ९ ठार

कीव,

Missile barrage on kyiv रशियाने शनिवारी रात्री युक्रेनची राजधानी कीववर ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने मोठा हवाई हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात किमान ९ नागरिकांचा मृत्यू झाला, तर २२ जण जखमी झाले.

हल्ल्यामुळे राजधानीतील अनेक निवासी आणि व्यावसायिक भागांचे मोठे नुकसान झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेनुसार, सोलोमियांस्की जिल्ह्यातील पाच मजली निवासी इमारतीवर हल्ल्यानंतर भीषण आग लागली. इमारतीचा काही भाग कोसळल्याने बचाव पथकाने वरच्या मजल्यांवर अडकलेल्या ३५ नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. या परिसरात दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन लहान मुलांसह आठ जण जखमी झाले.

दरम्यान, डार्नित्स्की जिल्ह्यावर झालेल्या हल्ल्यात सर्वाधिक हानी झाली. येथे सात नागरिकांचा मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले. या भागातील घरे, वाहने, प्रशासकीय इमारत आणि एका अनिवासी इमारतीलाही आग लागून मोठे नुकसान झाले. शेवचेन्किव्हस्की जिल्ह्यातील एका अनिवासी इमारतीला लागलेली आग अग्निशमन दलाने आटोक्यात आणली. तसेच अन्य एका निवासी इमारतीत काही नागरिक अडकल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली असून इतर दोन जिल्ह्यांतील निवासी आणि व्यावसायिक इमारतींचेही नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी देशाच्या हवाई सुरक्षेसाठी अधिक सक्षम संरक्षण प्रणालींची आवश्यकता पुन्हा अधोरेखित केली. त्यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्याशी चर्चा केल्याची माहिती देत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या अलीकडील बैठकीलाही सकारात्मक आणि फलदायी असे संबोधले. रशियाच्या सातत्यपूर्ण क्षेपणास्त्र हल्ल्यांचा मुकाबला करण्यासाठी पॅट्रियट क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण प्रणाली आणि त्यासाठी आवश्यक इंटरसेप्टर्स हे युक्रेनचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले.

याआधी जुलैमध्ये अंकारा येथे झालेल्या नाटो शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेकडून युक्रेनला पॅट्रियट प्रणालीच्या निर्मितीचा परवाना देण्याबाबत सकारात्मक संकेत देण्यात आले होते. मात्र, शुक्रवारी मेरीलँडमधील कॅम्प डेव्हिड येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या विषयावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे सांगितले. त्यामुळे युक्रेनला अपेक्षित असलेल्या संरक्षण सहाय्याबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur