Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
माधुरी दीक्षितही झाली 'लॉली'ची चाहती

माधुरी दीक्षितही झाली 'लॉली'ची चाहती

मुंबई

Madhuri dixit सोनी मराठीवरील 'कोण होणार करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनातून अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या सहजसुंदर शैलीने प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

स्पर्धक आणि सेलिब्रिटी पाहुण्यांसोबतच्या तिच्या दिलखुलास गप्पांमधून तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही अनेक रंजक गोष्टी समोर येतात. यंदाच्या शनिवारी प्रसारित होणाऱ्या विशेष भागात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची संपूर्ण टीम सहभागी होणार असून, या भागात मनोरंजनाची रंगत आणखी वाढणार आहे.

या विशेष भागात माधुरीने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कलाकारांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांना विविध प्रश्न विचारले. याचदरम्यान नम्रता संभेरावने साकारलेल्या 'लॉली' या पात्राचा विषय निघाला. माधुरीने या भूमिकेचे कौतुक करताना, 'मला ही लॉली खूपच आवडते!' असे सांगितले. आपल्या भूमिकेची खुद्द माधुरी दीक्षित चाहती असल्याचे समजल्यावर नम्रताला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. तिने माधुरीला, 'तुम्ही माझं हे कॅरेक्टर पाहिलं आहे?' असा प्रश्न विचारला. त्यावर माधुरीने होकार देत नम्रताने सादर केलेल्या डेंटिस्टच्या स्किटची आठवणही सांगितली.यानंतर नम्रताने माधुरीला लॉलीचा एखादा संवाद बोलून दाखवण्याची विनंती केली. माधुरीनेही 'मेरी आँखों में झाँको!' हा लॉलीचा लोकप्रिय संवाद आपल्या शैलीत सादर केला. तिच्या तोंडून हा संवाद ऐकताच मंचावर हास्याची लाट उसळली. या प्रसंगामुळे कार्यक्रमातील मनोरंजनाला नवी रंगत आली.यावेळी नम्रताने 'लॉली' हे पात्र साकारण्यामागची प्रेरणा आणि त्याच्या निर्मितीचा प्रवासही उलगडला. ती म्हणाली की, लालबागमधील एका चाळीत तिचे बालपण गेले. त्यामुळे लहानपणापासूनच चाळीतील आणि परिसरातील महिलांचे हावभाव, बोलण्याची पद्धत आणि त्यांचे वागणे तिने जवळून पाहिले. त्याचा उपयोग तिला विविध व्यक्तिरेखा साकारताना झाला. लेखक आणि क्रिएटिव्ह टीम प्रत्येक पात्रासाठी काहीतरी वेगळे शोधण्याचा प्रयत्न करत असते, असेही तिने सांगितले.'लॉली'ची हेअरस्टाईल स्वतः ठरवल्याचे नम्रताने स्पष्ट केले. हे पात्र इतरांपेक्षा वेगळे दिसावे, अशी तिची इच्छा होती. लॉली थोडेफार इंग्रजी बोलते; मात्र आपण अतिशय उत्तम इंग्रजी बोलत असल्याचा तिला प्रचंड आत्मविश्वास असतो. अशा छोट्या निरीक्षणांना थोडा अतिशयोक्तीपूर्ण रंग देत हे आगळेवेगळे पात्र घडल्याचे नम्रताने सांगितले. माधुरी दीक्षित आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांमधील या गप्पांमुळे 'कोण होणार करोडपती'चा आगामी विशेष भाग प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur