मुंबई,
Prajakta Tanpure आगामी विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शनिवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा हायव्होल्टेज पक्षप्रवेश पार पडला. प्राजक्त तनपुरे यांच्यासोबत त्यांच्या मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांनीही भाजपचे कमळ हाती घेतले आहे. आगामी विधान परिषदेसाठी भाजप त्यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षासाठी हा अत्यंत मोठा धक्का मानला जात आहे.
पहिल्यांदाच आमदार झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये थेट मंत्रिपद भूषवणारे प्राजक्त तनपुरे हे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे सुपुत्र आहेत. पहिल्याच निवडणुकीत भाजपचे दिग्गज नेते शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव करून त्यांनी आपली राजकीय ताकद दाखवून दिली होती. त्यामुळे त्यांचा हा पक्षप्रवेश भाजपसाठी या भागातील गणिते बदलणारा ठरणार आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना प्राजक्त तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी केवळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांचे राजकीय भवितव्य आणि विकासकामांसाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. विरोधी पक्षात असताना मतदारसंघात विकासकामे रखडली होती आणि त्याची मोठी किंमत मतदारसंघाला चुकवावी लागली, म्हणूनच कार्यकर्त्यांच्या इच्छेचा आदर करून आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्ष आगामी काळात जी जबाबदारी देईल, ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या राजकीय भूकंपादरम्यान, Prajakta Tanpure त्यांचे मामा आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार का, या रंगणाèया चर्चांवर प्राजक्त तनपुरे यांनी मौन सोडले. ते म्हणाले की, आपल्या भाजप प्रवेशाचा आणि जयंत पाटील यांच्या राजकीय समीकरणाचा दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नाही. आम्ही दोघे जरी नातेसंबंधाने मामा-भाचे असलो, तरी दोघांच्याही मतदारसंघाची राजकीय गणिते आणि परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. जयंत पाटील यांची राजकीय उंची आणि अनुभव खूप मोठा असून आपल्या निर्णयाचा त्यांच्या पुढील राजकीय दिशेशी कोणताही संबंध जोडता येणार नाही, असे सांगत त्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या.

