Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मल्लिकार्जुन खडगे आणि विरोधी पक्षनेतेपद

मल्लिकार्जुन खडगे आणि विरोधी पक्षनेतेपद

दिल्ली वार्तापत्र,

Mallikarjun-kharge : राज्यसभेचे सदस्य म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी सोमवारी शपथ घेतली, आणि लगेच त्यांची राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून फेरनियुक्ती झाली.

खडगे यांच्याआधी काँग्रेसचेच गुलाम नबी आझाद राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते. राज्यसभा सदस्य म्हणून आझाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर खडगे यांची राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. 16 फेब्रवारी 2021 ला खडगे पहिल्यांदा विरोधी पक्षनेते झाले, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे.

खडगे यांच्याकडे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अशी दोन प्रमुख पदे आहेत. त्यामुळे यावेळी काँग्रेस राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून नव्या नेत्याची निवड करेल, असे सर्वांना वाटत होते, राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदावर डोळा ठेऊन असलेले किमान अर्धाडझन नेते आहेत. पण या सर्वांची पुन्हा एकदा निराशा झाली. काँग्रेसने खडगे यांच्या नेतृत्वावरच विश्वास दाखवला. याचा अर्थ काँग्रेसच्या नेतृत्वाने राज्यसभेतील काँग्रेसच्या अन्य नेत्यांवर अविश्वास दाखवला आहे. काँग्रेस सांसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी या पहिल्यांदाच राज्यसभेत आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसला राज्यसभेत कोणताही धोका पत्करायचा नव्हता, असे दिसते, त्यामुळे पक्षाने खडगे यांचीच विरोधी पक्षनेते म्हणून फेरनिवड केली.

राज्यसभा सदस्य म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर गुलाब नबी आझाद यांना काँग्रेस आपल्याला पुन्हा राज्यसभेवर पाठवेल, असे वाटत होते. पण तसे झाले नाही. काँग्रेस पक्षाने त्यांना राज्यसभेवर पाठवले नाही. त्यामुळे ते दुखावले गेले. त्यातूनच त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत जम्मू काश्मीरमध्ये आपल्या नव्या पक्षाची स्थापना केली. विशेष म्हणजे आझाद राज्यसभा सदस्य म्हणून निवृत्तीच्या आधीपासूनच काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराज होते. काँग्रेसमधील असंतुष्टांच्या जी 23 गटाने राहुल गांधींच्या कार्यपध्द्तीबद्दल नाराजी व्यक्त करणारे पत्र सोनिया गांधींना पाठवले होते, त्याचे कर्तेधर्ते आझादच होते. काँग्रेसच्या नेतृत्वाने आझाद यांना राज्यसभेवर न पाठवण्यामागै हेच एक कारण होते, असे म्हणतात.

मल्लिकार्जुन खडगे यांच्या राजकीय अनुभवाबद्दल आणि क्षमतेबद्दल बोलण्याचे कारण नाही. मात्र त्यांचे आता वय झाले आहे, तसेच काही शारीरिक अडचणीही आहेत. वाढते वय आणि वाढत्या वजनामुळे शारीरिक हालचाली करण्यात त्यांना त्रास होतो, त्यामुळे काँग्रेस नव्या दमाच्या नेत्याची निवड करेल, असे वाटत असतांना काँग्रेसने राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद दम लागणाऱ्या नेत्याकडे सोपवले, याचे अनेकांना आश्चर्य वाटले.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून आझाद यांचा कार्यकाळ सर्वात मोठा म्हणावा लागेल. दोन टप्प्यात मिळून 6 वर्ष 252 दिवस ते विरोधी पक्षनेते होते. 8 जून 2014 ते 10 फेब्रुवारी 2015 या काळात ते पहिल्यांदा विरोधी पक्षनेते झाले. दुसऱ्या म्हणजे 23 फेब्रुवारी 2015 ते 15 फेब्रुवारी 2021 असा त्यांचा विरोधी पक्षनेते म्हणून जवळळपास सहा वर्षाचा कार्यकाळ होता. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर गुलाम नबी आझाद हे काँग्रेसचे राज्यसभेतील पहिले विरोधी पक्षनेते म्हणावे लागतील.

सर्वाधिक काळ विरोधी पक्षनेतेपदी राहण्याचा आझाद यांचा विक्रम मोडण्याची संधी खडगे यांना चालून आली आहे. खडगे विरोधी पक्षनेतेपदी आणखी एक वर्ष राहिले तर ते गुलाम नबी आझाद यांचा विक्रम सहज मोडू शकतात. खडगे यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या कार्यकाळात पियुष गोयल आणि जे. पी. नड्डा सत्तापक्षाचे नेते होते. आझाद विरोधी पक्षनेते असतांना अरुण जेटली आणि थावरचंद गहलोत सत्तापक्षाचे नेते होते.

संपुआ सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात भाजपाचे अरुण जेटली विरोधी पक्षनेते होते. 3 जून 2009 ते 26 मे 2014 या काळात जेटली विरोधी पक्षनेते होते. जेटली जवळपास पाच वर्ष विरोधी पक्षनेते होते. संपुआ सरकारच्या पहिल्या कार्यकाळात भाजपाचे जसवंतसह यांनी विरोधी पक्षनेते भूषवले. जसवंतसह यांना विरोधी पक्षनेते म्हणून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करण्यात 18 दिवस कमी पडले.

पंतप्रधान व्हायच्या आधी डॉ. मनमोहनसग यांनीही राज्यसभेतील विरोधी पक्षनेते भूषवले. 6 वर्ष 64 दिवस सग विरोधी पक्षनेते होते. त्यांच्या काळात सिकंदर बख्त आणि जसवंतसह हे सत्तापक्षाचे नेते होते.

सत्तापक्षनेते होण्याच्या आधी सिकंदर बख्त यांनी विरोधी पक्षनेतेपदही सांभाळले. 1 वर्ष 291 दिवस ते या पदावर होते. त्यांना दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेतेपद सांभाळण्याची संधी मिळाली. त्याआधी 1992 ते 1996 या काळात बख्त विरोधी पक्षनेते होते. काँग्रेसचे शंकरराव चव्हाण सर्वांत कमी काळ म्हणजे फक्त 9 दिवस विरोधी पक्षनेते होते. चव्हाण यांच्यानंतर एम.एस. गुरुपदस्वामी आपल्या दुसऱ्या कार्यकाळात फक्त 23 दिवस विरोधी पक्षनेते होते. त्याआधी 24 मार्च 1971 ते 2 एप्रिल 1972 असे जवळपास वर्षभर ते विरोधी पक्षनेते होते. पहिल्यांदा गुरुपदस्वामी यांनी संघटन काँग्रेसचे तर दुसऱ्यांदा जनता दलाचे नेते म्हणून विरोधी पक्षनेते सांभाळले. भोला पासवान शास्त्री 27 दिवस विरोधी पक्षनेते पदावर होते.

भाजपाचे लालकृष्ण अडवाणी 77 दिवस राज्यसभेत विरोधी पक्षनेते हेोते. पण या काळात ते भाजपाचे नाही तर जनता पक्षाचे नेते म्हणून या पदावर होते. अडवाणी यांनी अनेक वर्ष राज्यसभेतील सत्तापक्षनेतेपद सांभाळले आहे. काँग्रेसचे कमलापती त्रिपाठी दोनवेळा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते झाले. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांचा पहिला कार्यकाळ 322 दिवसांचा तर दुसरा कार्यकाळ 1 वर्ष 291 दिवसांचा होता.

संघटन काँग्रेसचे श्यामनंदन प्रसाद मिश्रा हे राज्यसभेतील पहिले अधिकृत विरोधी पक्षनेते म्हणावे लागतील. 18 डिसेंबर 1969 ते 11 मार्च 1971 या काळात ते विरोधी पक्षनेते होते. 13 मे 1952 ते 17 डिसेंबर 1969 या काळातील विरोधीपक्षनेतेपदाबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. पुंजला शिवशंकर आणि जयपाल रेड्डी या दोघांनीही विरोधी पक्षनेते सांभाळले. शिवशंकर काँग्रेसचे तर रेड्डी जनता दलाचे नेते होते.

विशेष म्हणजे राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदासोबत उपनेताही असतो. भाजपातर्फे आतापर्यंत एस.एस. अहलुवालिया आणि रविशंकरप्रसाद, तर काँग्रेसतर्फे आनंद शर्मा, पी. चिदंबरम आणि प्रमोद तिवारी हे उपनेते झाले. आनंद शर्मा तर सर्वाधिक काळ म्हणजे 7 वर्ष 298 दिवस उपनेते होते, तर प्रमोद तिवारी यांनी तीन वर्ष 110 दिवस हे पद उपभोगले, तर चिदंबरम 344 दिवस उपनेते होते. भाजपाचे अहलुवालिया 2 वर्ष 304 दिवस तर रविशंकर प्रसाद 1 वर्ष 310 दिवस या पदावर होते. पण गंमंत म्हणजे भाजपामधील असो की, काँग्रेसमधील एकही उपनेता आतापर्यंत राज्यसभेतील विरोधी पक्षनेता झाला नाही. या सर्वांना उपनेतेपदावरच समाधान मानावे लागले. विरोधी पक्षनेते म्हणू दुसऱ्या कार्यकाळात खडगे यांची कामगिरी कशी राहणार, याकडे आता सर्वांचे लक्ष राहणार आहे.

श्यामकांत जहागीरदार

9881717817

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur