Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मृतदेह ठरताहेत जिवंत लाेकांसाठी धोकादायक

मृतदेह ठरताहेत जिवंत लाेकांसाठी धोकादायक

काठमांडूnepal flood चीनमधील तिबेटमध्ये झालेल्या हिमस्खलनाचे परिणाम संपूर्ण हिमालयीन प्रदेशात अजूनही जाणवत आहेत. नेपाळमधील भोटेकोशी नदीला आलेल्या महापुरामुळे बाधित झालेल्या लोकांची नेमकी संख्या अद्याप अस्पष्ट आहे.

गत चार दिवसांपासून पीडितांचा शोध सुरू आहे. येथील नैसर्गिक आपत्तीचा धोका कमी झाला असला तरी, तेथील लाेकांपुढे नवीन धोके निर्माण झाले आहेत. आता मृतदेह जिवंत लाेकांसाठी धाेकादायक ठरत असून संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे़.

या महापुरामुळे नेपाळमध्ये संसाधनाची कमतरता माेठ्या प्रमाणात जाणवत आहे़ मृतांची आणि मृतदेहांची सतत वाढणारी संख्या नेपाळी सरकारसाठी डोकेदुखी बनली आहे. किंबहुना, पुरामुळे बाधित झालेल्या अनेक दुर्गम भागांमधील आरोग्य सेवांची स्थिती अत्यंत वाईट आहे. या ठिकाणी मृतदेह साठवण्याचीही योग्य व्यवस्था नाही़ त्यामुळे उघड्यावर पडून असलेले मृतदेह सडत आहेत़ त्यामुळे या संवेदनशील प्रदेशासाठी एक नवीन संकट निर्माण होत आहे. तसेच जलस्त्राेत दुषित झाल्यामुळे पिण्याचे पाणीही विषारी बनले आहे़

शेकडो किलोमीटर अंतरावर सापडले शेकडाे मृतदेह

भोटेकोशी आणि त्रिशुली नद्यांना आलेल्या विनाशकारी पुरानंतर नेपाळमधील परिस्थिती अत्यंत गंभीर, आव्हानात्मक आणि संवेदनशील आहे. आपत्तीनंतरच्या मदत आणि बचाव कार्यात तसेच मृतदेहांच्या व्यवस्थापनात साहाय्य करण्यासाठी सुरक्षा दले तैनात करण्यात आली आहेत. असे असूनही समस्या मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या आहेत. पुराच्या प्रवाहापासून शेकडो किलोमीटर अंतरावरील जिल्ह्यांमध्ये शेकडाे मृतदेह सापडले आहे़ तर अद्यापही शेकडाे लाेक बेपत्ता आहेत़.पिण्याचे पाणी आणि अन्नाचे संकट

विनाशकारी पुरातून कसेबसे बचावलेले नेपाळी नागरिक आता दुहेरी आणि अत्यंत गंभीर मानवी संकटाचा सामना करत आहेत. जीवनावश्यक वस्तूंची तीव्र कमतरता आणि गोंधळामुळे विस्थापित छावण्या आणि पूरग्रस्त भागांमधील परिस्थिती सतत बिघडत आहे. पुरात घरे आणि दुकाने वाहून गेल्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड आणि दमा यांसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेले छावण्यांमधील रुग्ण अनेक दिवसांपासून औषधांशिवाय आहेत. तसेच पुरामुळे पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याचे मुख्य स्रोत पूर्णपणे नष्ट झाले आहेत़ तर त्रिशुली जलविद्युत प्रकल्पाचा कालवा आणि पुरवठा वाहिन्या वाहून गेल्यामुळे रुग्णालये आणि स्थानिक वस्त्यांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.



Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur