-'महाराष्ट्र ज्ञान सभा'राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
नागपूर,
नव्या शिक्षण धोरणाद्वारे मनुष्यबळ तयार केले जातेय, ज्यात एक सर्वांगीण विकास होईलच, नैतिक आणि व्यावसायिक गुणांचे रोपणही व्हावे, जेणेकरून बौद्धिक, भावनिक, शारीरिक व नैतिक क्षमता विकासाबरोबरच देशाच्या अर्थव्यववस्थेतील योगदान ठरावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिक्षा संस्कृती उत्थान न्यासतर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, व्हीएनआयटी व आयआयएम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'Maharashtra Gyan Sabha' महाराष्ट्र ज्ञानसभा राष्ट्रीय संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
शिक्षा संस्कृती उत्थान न्यासचे राष्ट्रीय सचिव अतुल कोठारी, राज्यपालांचे मुख्य सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, आयआयएम नागपूरचे संचालक भीमराया मेत्री, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत बोकारे, व्हीएनआयटीच्या मंडळाचे अध्यक्ष मदाभूशी मदन गोपाल, संचालक डॉ. प्रेमलाल पटेल, लघु उद्योग भारतीचे रवलीनसिंग खुराना व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वैश्विक ज्ञानाचे भारतीयीकरण व भारतीय ज्ञानाचे वैश्विकरण करणे, हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. केवळ ऐतिहासिक बाबींचा गौरवपूर्ण उल्लेख करुन आम्ही महान होणार नाही, तर यासह वर्तमान व भविष्याची वैश्विक आव्हाने लक्षात घेऊन त्यानुसार आमच्या शैक्षणिक पद्धतीला दिशा द्यावी लागेल.
'Maharashtra Gyan Sabha' आज जग अत्यंत वेगाने पुढे जात आहे. मागील वर्षांतच तीन औद्योगिक क्रांतींचा अनुभव जगाने घेतला आहे. बदलांची गती लक्षात घेतली नाही, तर आम्ही मागे राहू शकतो. या क्रांतीला गती देणारे 'एआय' व 'डीप टेक्नॉलॉजी'च्या विकासात भारतीयांचे अत्यंत मोलाचे योगदान राहिले आहे. जागतिक ज्ञान आणि भारतीय ज्ञान व्यवस्थेचा मेळ साधणारी आणि जागतिक आव्हानांचा सामना करणारी शिक्षण पद्धती आम्हाला विकसित करायची आहे, याकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले. डीप टेक व एआय तंत्रज्ञान सर्व क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढेल, असा याचा अर्थ नाही. तंत्रज्ञान कधीच थांबत नाही. तंत्रज्ञानासोबत पुढे जाण्याची गरज आहे. परिषदेतची स्मरणिका तसेच 'बेस्ट प्रॅक्टीसेस ऑफ गोंडवाना युनिव्हर्सिटी' या पुस्तिकेचे प्रकाशनही पार पडले.

