Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नेपाळ-चीन सीमेवरील हिमनदीच्या प्रलयाआधी दिसले होते संकेत

नेपाळ-चीन सीमेवरील हिमनदीच्या प्रलयाआधी दिसले होते संकेत

काठमांडू,

Glacial Doomsday Signs नेपाळ-चीन सीमेवरील हिमालयीन भागात हिमनदी कोसळल्यानंतर झालेल्या भीषण भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे १,१०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. मात्र, या मोठ्या आपत्तीच्या काही दिवस आधीच परिसरात संभाव्य धोक्याचे संकेत दिसून आले होते, असा दावा हायरिस्क सायंटिफिक कन्सोर्टियमच्या (HiRISK Scientific Consortium) अहवालातून करण्यात आला आहे.हिमनदी कोसळण्यापूर्वी परिसरातील नैसर्गिक स्थितीत काही महत्त्वाचे बदल जाणवत होते.

वितळलेल्या बर्फातून वाहणाऱ्या पाण्याला आलेला विशिष्ट तपकिरी रंग आणि आसपासच्या खडकाळ उतारांवर निर्माण झालेल्या भेगा ही त्यापैकी काही संकेत असल्याचे शास्त्रज्ञांनी नमूद केले आहे. मात्र, उंच आणि दुर्गम हिमालयीन भागात अशा बदलांवर सातत्याने लक्ष ठेवणे तसेच त्यांची वेळेत नोंद घेणे मोठे आव्हान ठरते.

या घटनेनंतर हिमनदीशी संबंधित आपत्तींसाठी प्रभावी पूर्वसूचना यंत्रणा किती आवश्यक आहे, यावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. अहवालानुसार, चीनमधील काही हिमनदी सरोवरांवर देखरेख करण्यासाठी अलीकडे पूर्वसूचना प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. मात्र, थेट हिमनदी कोसळण्यामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांसाठी स्वतंत्र आणि प्रभावी यंत्रणा उपलब्ध नव्हती. हिमनदी कोसळण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या भूस्खलनाचा वेग अत्यंत मोठा असल्याने सीमावर्ती तपासणी नाक्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी पारंपरिक सूचना प्रणालीलाही पुरेसा वेळ मिळाला नसता, असे अहवालात म्हटले आहे. मात्र, प्रवाहाच्या खालच्या दिशेने असलेल्या भागांना परिस्थितीची पूर्वकल्पना देण्यासाठी अधिक वेळ उपलब्ध होऊ शकला असता. शास्त्रज्ञांच्या मते, किमान १० मिनिटे किंवा त्याहून आधी इशारा देणारी व्यापक पूर्वसूचना यंत्रणा कार्यरत असती, तर अनेकांचे प्राण वाचवता आले असते. अशा यंत्रणेत केवळ हिमनदी सरोवरांवर लक्ष केंद्रित न करता अस्थिर हिमनद्या आणि त्यांच्या आसपासच्या पर्वतीय उतारांवरही सातत्याने नजर ठेवण्याची गरज आहे.

या पार्श्वभूमीवर नेपाळ आणि चीनमधील सीमापार समन्वयाचाही मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. नैसर्गिक आपत्तींच्या निरीक्षणासाठी सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांची मे महिन्यात बैठक झाली होती. मात्र, तज्ज्ञांच्या मते, सीमावर्ती भागातील आपत्तींचे स्वरूप पाहता दोन्ही देशांमध्ये माहितीची देवाणघेवाण, संवाद आणि धोक्यांचे संयुक्त विश्लेषण अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे. स्टिमसन सेंटरच्या एनर्जी, वॉटर अँड सस्टेनेबिलिटी प्रोग्रामचे वरिष्ठ फेलो ऑस्टिन लॉर्ड यांनीही अलीकडील लेखातून याच बाबीवर भर दिला आहे. हिमालयातील वाढत्या धोक्यांबाबत यापूर्वीही अनेक अहवाल समोर आले आहेत. मात्र, HiRISK चा अहवाल हा इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट (ICIMOD) ने मार्च २०२६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या दोन अहवालांपेक्षा वेगळा आहे. ICIMODच्या अभ्यासात हिंदुकुश हिमालयातील दीर्घकालीन बदलांचा आढावा घेत हिमनद्या वेगाने वितळत असल्याने हिमनदीसंबंधित धोक्यांमध्ये वाढ होण्याचा इशारा देण्यात आला होता. अहवालानुसार, १९९० ते २०२० या कालावधीत हिंदुकुश हिमालयातील हिमनद्यांचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १२ टक्क्यांनी कमी झाले, तर त्यांच्या अंदाजित बर्फसाठ्यात ९ टक्क्यांची घट झाली. त्याचबरोबर २००० सालापासून हिमनद्यांमधील बर्फ वितळण्याचा वेग दुप्पट झाला आहे. या प्रदेशातील तुलनेने लहान हिमनद्या सर्वाधिक वेगाने आकुंचन पावत असल्याचेही समोर आले आहे. हिंदुकुश हिमालयातील सुमारे तीन-चतुर्थांश हिमनद्या ०.५ चौरस किलोमीटरपेक्षा कमी क्षेत्रफळाच्या असून, त्या अधिक असुरक्षित श्रेणीत येतात. ICIMODने हिमनद्यांच्या निरीक्षण व्यवस्थेतील मोठ्या त्रुटींकडेही लक्ष वेधले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur