Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ऑरेंज जर्सीवरून उठलेल्या वादाला पूर्णविराम! VIDEO

ऑरेंज जर्सीवरून उठलेल्या वादाला पूर्णविराम! VIDEO

नवी दिल्ली,

Orange-jersey-controversy : हॉकी इंडियाने १५ ते ३० ऑगस्ट दरम्यान बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये आयोजित होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पुरुष आणि महिला दोन्ही संघांची घोषणा आधीच केली होती.

हॉकी इंडियाने आता या भव्य स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या नवीन जर्सीचे अनावरण केले आहे, जी केशरी रंगाची आहे. या जर्सीच्या अनावरणामुळे मोठा वाद निर्माण झाला असून, भारताचे माजी कर्णधार विरेन रासकिन्हा यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि भारतीय हॉकीचा ओळख असलेला निळा रंग बदलण्याच्या गरजेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हॉकी इंडियाने आता या सर्व मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली असून, सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंकडून सूचना मिळाल्यानंतर जर्सीचा रंग बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

निळ्या रंगाच्या टर्फमुळे जर्सीचा रंग बदलण्यात आला

विश्वचषकासाठी जर्सीचा रंग बदलण्याबाबतच्या प्रश्नांना उत्तर देताना, हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पुरुष आणि महिलांचा एफआयएच हॉकी विश्वचषक १५ ऑगस्ट रोजी बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये सुरू होणार आहे. यापूर्वी भारतीय संघाच्या नवीन जर्सीचे अनावरण करण्यात आले. यावेळी जर्सीचा रंग केशरी आहे. यापूर्वी जर्सीचा रंग निळा होता आणि जर्सीचा रंग बदलण्याची ही पहिली वेळ नाही. यावेळी, आमचे सपोर्ट स्टाफ आणि खेळाडूंनी सुचवले की मैदान (निळे टर्फ) आणि खेळाचा किट दोन्ही निळे असल्यामुळे एकमेकांना ओळखणे आणि दृश्यमानता कमी होते. जर्सीच्या रंगासाठी पिवळा आणि केशरी असे दोन पर्याय सुचवण्यात आले होते. केशरी रंगाची निवड करण्यात आली, जो आपल्या राष्ट्रध्वजाच्या तीन रंगांपैकी एक आहे. स्पर्धेनंतर खेळाडूंना हा रंग आवडला नाही, तर आम्ही त्यात सुधारणा कशी करता येईल यावर काम करू शकतो.

जर्सीचा रंग बदलण्याची ही पहिली वेळ नाही

भारतीय हॉकीचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी सांगितले की, जर्सीचा रंग बदलण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, २०१४ च्या एफआयएच हॉकी विश्वचषकात टीम इंडियाची जर्सी पिवळ्या रंगाची होती, तर २०१८ च्या एफआयएच हॉकी विश्वचषकात आकाशी रंगाची जर्सी परिधान करण्यात आली होती. भारतीय हॉकी संघ आगामी विश्वचषक स्पर्धेत १९ ऑगस्ट रोजी वेल्सविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur