Dailyhunt
पाेलिसांशी चालानवरून वाद महागात

पाेलिसांशी चालानवरून वाद महागात

अनिल कांबळे

नागपूर,

Dispute with police over challan लकडगंज वाहतूक पाेलिसांशी गैरवर्तन करणे एका युवक आणि त्याच्या मैत्रिणीला चांगलेच महागात पडले. दुचाकीवर केलेल्या चालानच्या कारवाईमुळे चिडून पाेलिसांशी वाद घातल्याने दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पाेलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2026 राेजी सकाळी इतवारी येथील जुन्या माेटर स्टँड चाैकात नाकाबंदीसाठी तैनात असलेले लकडगंज वाहतूक शाखेचे पाेलिस हवालदार नरेश लिखार यांनी हेल्मेट न घातलेल्या अजय राणे (29) या अ‍ॅक्टिवा चालकाला थांबवले. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर कागदपत्रांची मागणी केली असता, त्याने कागदपत्रे दाखवण्यास नकार देत पाेलिसांशी उद्धटपणे वागणूक केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला.

यानंतर पाेलिसांनी वाहन क्रमांकाच्या आधारे हेल्मेट न घालणे, परवाना नसताना वाहन चालवणे आणि आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 3250 रुपयांचा चालान केला. काही वेळानंतर संबंधित युवक मैत्रिण तेजस्विनी लवनकर (30) हिच्यासह पुन्हा घटनास्थळी आला. चालान केल्यावरुन दाेघांनी पाेलिसांशी वाद घालत शिवीगाळ केली आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच वाहतूक पाेलिसांनी नियंत्रण कक्षाला काॅल केला. त्यानंतर अतिरिक्त पाेलिस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि दाेघांना ताब्यात घेण्यात आले. लकडगंज पाेलिस ठाण्यातही दाेघांचे वर्तन आक्रमकच राहिले असून त्यांनी तेथेही पाेलिसांशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पाेलिसांनी दाेघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा, शिवीगाळ आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur