- तत्काळ उपचार करा : डॉ. हर्षल राठोड
यवतमाळ,
मानवी जीवनात वेळेचे अनन्यसाधारण महत्व आहे. असे असले तरी वेळेपेक्षाही मानवी जीव अधिक मौल्यवान आहे.
२९ ऑक्टोबरला जागतिक पक्षाघात दिन आहे. या दिनाच्या पूर्वसंध्येला पक्षाघात या आजारावर प्रकाश टाकताना डॉ. राठोड बोलत होते. 'बी फास्ट' हे या वर्षीच्या पक्षाघात दिनाचे घोषवाक्य आहे. या शब्दाचा अर्थ 'त्वरा करा' असा असला तरी पक्षाघाताची लक्षणे दर्शविणार्या वेगवेगळ्या शब्दांचे हे संक्षिप्त रूप आहे. पक्षाघात झाल्यापासून साडेचार तास रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अतिशय महत्वाचे समजले जातात. वैद्यक शास्त्रात त्यांना 'सोनेरी तास' असे संबोधले जाते. पक्षाघाताची लक्षणे सर्वसाधारणपणे तोल जाणे, नीट चालता न येणे, डोळ्यांना अंधेरी येणे, दोन्ही किंवा एका डोळ्याची दृष्टी एकाएकी अंधुक होणे, तोंड वाकडे होणे, बाहूंमध्ये अशक्तपण येणे, बोलताना अडखळणे किंवा जीभ जड होणे ही आहेत. पक्षाघाताचा झटका आल्यापासून साडेचार तासांपूर्वी रुग्णाला जेवढ्या लवकर उपचार मिळेल तेवढा अधिक लाभ त्याला होतो.
मेंदूला संदेश वहनाचे महत्वाचे कार्य करणार्या न्युरॉन्स कोशिका करतात. पक्षाघातामुळे प्राणवायू पुरवठा खंडित होऊन ह्या कोशिका मरू लागतात. त्याचा मृत होण्याचा वेग खूपच जास्त असतो. प्राणवायूच्या अभावामुळे न्युरॉन्स कोशिकांचे जे नुकसान होते, त्याला हायपोक्सिया असे म्हणतात. ही अवस्था निर्माण झाली की, प्रती सेकंद ३० हजार कोशिका मरू लागतात. त्यामुळे रुग्णाच्या मेंदूला होणारी हानी न भरून निघणारी असते, डॉ. हर्षल राठोड यांनी सांगितले. ही अवस्था दीर्घकाळ टिकून राहिल्यास रुग्णाला कायम अपंगत्व येऊ शकते किंवा त्याचा मृत्यूदेखील होऊ शकतो. त्याचा ह्या गंभीर परिणामापासून बचाव करावयाचा असेल तर त्याला 'ते' सोनेरी तास संपण्याआधी जेवढ्या लवकर उपचार मिळतील तेवढे त्याचे कमी नुकसान होईल. त्याला कायम अपंगत्व अथवा मृत्यू येण्यापासून वाचविण्यासाठी त्वरित उपचारांशिवाय पर्याय नसतो, असे ते म्हणाले.
मेंदूच्या एखाद्या भागाचा रक्तपुरवठा खंडित होऊन प्राणवायूचा पुरवठाही थांबतो. तेव्हा त्या भागात पक्षाघात होतो. त्यामुळे मेंदूच्या रक्तवाहिन्यांना नुकसान होते. याचा परिणाम वेगवेगळ्या अवयवांवर होऊन अपंगत्व येते. एका अहवालानुसार, भारतात एक लक्ष व्यक्तींमागे किमान ८४ ते कमाल २६२ लोक पक्षाघातामुळे बाधित होतात. ह्यात वृद्धांची संख्या अधिक असली तरी या आजारापासून आबालवृद्ध कोणाचीही सुटका नाही. हा आजार 'लकवा' म्हणूनही ओळखल्या जातो, असेही डॉ. हर्षल राठोड यांनी सांगितले.

