दिल्ली वार्तापत्र,
Punjab-assembly-bjp : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत अभूतपूर्व विजय मिळाल्यानंतर भाजपाने आपले संपूर्ण लक्ष आता पंजाब विधानसभा निवडणुकीकडे वळवले आहे. देशात बिहार आणि महाराष्ट्रानंतर पंजाब असे राज्य होते, ज्याठिकाणी भाजपाला आपल्या मित्रपक्षासोबत निवडणूक लढवावी लागत होती.
या तीनही राज्यात सुरुवातीची अनेक वर्ष भाजपा लहान भावाच्या भूमिकेत होता. आता मात्र बिहार आणि महाराष्ट्रात भाजपा मोठ्या भावाच्या भूमिकेत आला आहे. मात्र असे असले तरी भाजपा या दोन्ही राज्यात अजूनही स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या मानसिकतेत नाही. या दोन्ही राज्यात भाजपा आपल्या मित्रपक्षांसोबत निवडणूक लढवत आहे. पंजाबचाही याला आतापर्यंत अपवाद नव्हता. पंजाबमध्ये गेली अनेक वर्ष भाजपा शिरोमणी अकाली दलासोबत निवडणूक लढवत होता. २०२२ मध्ये पहिल्यांदा याला छेद गेला.
२०२७ मध्ये होणारी पंजाब विधानसभेची निवडणूक भाजपाने स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. या राज्यात भाजपाने अकाली दलाशी असलेली आपली मैत्री तोडली नाही, तर अकाली दलाने भाजपासोबतच्या आपल्या मैत्रीला निरोप दिला. या संधींचा फायदा घेत २०२७ मध्ये होणार्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत सर्व म्हणजे ११७ जागा स्वबळावर लढवण्याची घोषणा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे.
पंजाबमध्ये भाजप आणि शिरोमणी अकाली दल पुन्हा एकत्र येतील, अशी चर्चा सुरु झाली होती, मात्र भाजपा आणि अकाली दलाचे सुखबीरसिंग बदाल यांनी या चर्चेला इन्कार केला. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हे एकेकाळी भाजपाचे सर्वात जुने मित्र होते. मात्र आता दोन्ही पक्षांची स्थिती 'दोस्त दोस्त ना रहा' सारखी झाली आहे.
पंजाबमध्ये सध्या आपची सत्ता आहे, भगवंत मान मुख्यमंत्री आहेत. आपची आतापर्यत देशातील दिल्ली आणि पंजाब अशा दोन राज्यात सत्ता होती, मात्र दीडवर्षापूर्वी आपने दिल्लीमधील आपली सत्ता गमावली, आता पंजाबमधील सत्ता गमावण्याच्याजवळ तो पोहोचला आहे. पंजाबमध्ये यावेळी बहुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. भाजपा, काँग्रेस, अकाली दल आणि सत्ताधारी आप अशी लढत राज्यात होईल, असे दिसते. पंजबामधील आपली सत्ता टिकवण्यासाठी आपला भाजपा, काँग्रेस आणि अकाली दल अशा तिघांशी लढत द्यावी लागणार आहे.
मुख्यमंत्री म्हणून भगवंत मान यांची पाच वर्षाची कामगिरी समाधानकारक राहिली नाही, मात्र आपने मान यांनाच पुन्हा नाईलाजाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केले आहे. आपचे सध्या पूर्णपणे रिकामे असलेले सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यासमोर याशिवाय अन्य कोणताही पर्याय नव्हता. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राघव चढ्डा यांच्यासह आपचे राज्यसभेतील सहा खासदार भाजपात सहभागी झाले आहे, यामुळे आपला मोठा धक्का बसला आहे.
पंजाबात भ्रष्टाचार, अंमली पदार्थ आणि बेरोजगारी तसेच कायदा आणि सुव्यवस्था असे चार प्रमुख मुद्दे आहे. यासोबत धर्मांतरण ही पंजाबमधील सर्वात मोठी समस्या झाल्याचे समजते. त्यामुळेच सत्तेवर आल्यानंतर धर्मांतरावर बंदी घालण्याचे आश्वासन भाजपाने दिले आहे.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर भाजपा पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात पंजाबमधील भाजपा नेत्यांना एका बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल. संतोष याच्यासोबत ही बैठक झाली. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून भाजपाने पंजाबमधील आपला अध्यक्ष बदलवला. आतापर्यंत काँग्रेसमधून आलेले सुनील जाखड पंजाब भाजपाचे अध्यक्ष होते. आता भाजपाने केवलसिंह ढिल्लो यांच्याकडे पंजाब प्रदेश भाजपाची जबाबदारी दिल्ली आहे. विशेष म्हणजे निवडणूक तयारीचाच भाग म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन तीन दिवस पंजाबच्या दौर्यावर होते.
भाजपाचे रवनीतसिंग बिट्टू सध्या केंद्रात मंत्री आहेत. मात्र राज्यसभा सदस्य म्हणून त्यांचा कार्यकाळ संपला आहे, भाजपाने त्यांना राज्यसभेची फेरउमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांना केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीत बिट्टू यांचा उपयोग करण्याचा भाजपाचा विचार असल्याचे समजते.
सामान्यपणे भाजपाच्या कोणत्याही कार्यक्रमात जनसंघाचे संस्थापक असलेले डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाल उपाध्याय आणि भारतमातेचे छायाचित्र राहात असते, यावेळी पंजाबमध्ये मात्र भाजपाने या तीन छायाचित्रांसोबत महाराजा रणजितसिंह यांचेही चौथे छायाचित्र ठेवले होते.
पंजाबमध्ये भाजपासोबतच्या युतीचा फायदा हा शिरोमणी अकाली दलाला मोठ्या प्रमाणात होत होता. अकाली दलाला राज्यात शिखांची तर भाजपाला हिंदूंची मते मिळायची. या दोन्ही मतांमुळे अकाली दलाचे सरकार राज्यात सत्तेवर येत होते. मात्र २०२० मध्ये पंजाबमधील शेतकरी आंदोलनाचे निमित्त करत अकाली दलाने भाजपाशी असलेली आपली मैत्री तोडली आणि याचा सर्वाधिक फटका त्यालाच बसला. राज्यात सत्तेवर येणे त्याला कठीण झाले. पंजाबमध्ये भाजपा आणि अकाली दलाची युती ही नैसर्गिक होती, राज्यातील जनतेने ती स्वीकारली होती. आता अकाली दलाला स्वबळावर लढावे लागणार असल्यामुळे सत्तेवर येण्याची त्याची शक्यता मावळली आहे.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष पहिल्यांदा वेगवेगळे लढले. याचा फटका दोन्ही पक्षांना बसला. भाजपाने विधानसभेच्या दोन जागा जिंकल्या, तर अकाली दलाला फक्त ३ जागांवर समाधान मानावे लागले. राज्यात भाजप आणि अकाली दल यांची युती होती, तेव्हा भाजपा विधानसभेच्या २३ जागा लढवायचा आणि अकाली दल ९४. लोकसभेच्या १३ पैकी दहा जागा अकाली दल लढवायचा तर भाजपाच्या वाट्याला फक्त ३ जागा यायच्या. म्हणजे भाजपाला विधानसभा असो की लोकसभा निवडणूक, दोन्ही ठिकाणी लहान भावाची भूमिका घ्यावी लागायची.
भाजपाला आता कोणत्याच राज्यात लहान भावाची भूमिका मान्य नाही. बिहार आणि महाराष्ट्रात भाजपा कधीच मोठा भाऊ झाला आहे, आता पंजाबमध्ये भाजपा मोठा भाऊ होण्याच्या तयारीत आहे. अकाली दलासोबतची युती तुटल्याचे भाजपाला अल्पकालिन नुकसान झाले असले तरी त्याचा दीर्घकालिन फायदाही झाला आहे.
२०२४च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेसने सात तर आपने ३ जागा जिंकल्या. शिरोमणी अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल या एकमेव विजयी झाल्या. सरबजितसिंह खालसा आणि खलिस्तासमर्थक अमृतपालसिंह हे दोन अन्य अमेदवारही विजयी झाले.
भाजपाला लोकसभेची एकही जागा जिंकता आली नसली तरी काँग्रेस आणि आपनंतर भाजपा राज्यात १८.५६ टक्के मते घेत तिसर्या स्थानावर आला. भाजपाने अकाली दलालाही मागे टाकले. त्यामुळे यावेळी भाजपाचा उत्साह वाढला आहे. भाजपाने राज्यातील विधानसभेच्या सर्व म्हणजे ११७ जागा स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा पूर्ण तयारी करुनच कोणत्याही राज्यातील निवडणुकीला सामोरा जात असतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पंजाबमधील विधानसभा निवडणुकीवर जातीने लक्ष ठेऊन आहे. अमित शाह ज्या राज्यातील निवडणुकीत लक्ष घालतात, तेथे भाजपाला जिंकण्यापासून कोणी रोखू शकत नाही, हा इतिहास आहे.
श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७

