Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पॅरा खेळाडूंचा ग्लासगोत सुवर्णधडाका; भारताच्या नावावर ७ पदके

पॅरा खेळाडूंचा ग्लासगोत सुवर्णधडाका; भारताच्या नावावर ७ पदके

ग्लासगो,

Para athletes strike gold in Glasgow ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय पॅरा खेळाडूंनी इतिहास रचत एकाच स्पर्धेत प्रथमच सात पदके जिंकण्याचा पराक्रम केला.

२८ सदस्यीय भारतीय पथकाने स्पर्धेचा शेवट ३ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य पदकांसह करत देशाची मान उंचावली. विशेष म्हणजे, ही पदकसंख्या यापूर्वीच्या सर्व राष्ट्रकुल स्पर्धांमधील भारताच्या एकूण पदकसंख्येइतकीच आहे. २००२ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत पॅरा खेळाडूंचा समावेश झाल्यानंतर भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य अशी सात पदके जिंकली होती. मात्र, यंदा भारतीय पॅरा खेळाडूंनी एकाच स्पर्धेत ही कामगिरी करून नवा विक्रम आपल्या नावावर केला.

या स्पर्धेत भारताला ॲथलेटिक्समध्ये तब्बल २० वर्षांनंतर पदक मिळाले. यापूर्वी २००६ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रणजित कुमार यांनी थाळीफेक प्रकारात भारतासाठी शेवटचे पदक जिंकले होते. यावेळी दिलीप महादू गवीत यांनी पुरुषांच्या १०० मीटर टी-४७ प्रकारात सुवर्णपदक पटकावले, तर त्याच स्पर्धेत मोहम्मद बासिल मोरासिंगनाकथ यांनी रौप्यपदक मिळवले. पुरुषांच्या शॉटपुट एफ-५७ प्रकारात सोमन राणा यांनी सुवर्णपदक जिंकले, तर शुभम जुयाल यांनी रौप्यपदकाची कमाई केली. महिलांच्या शॉटपुट एफ-५७ प्रकारात शर्मिला यांनी सुवर्णपदक मिळवले, तर शिल्पा श्याला यांनी कांस्यपदक पटकावले. तसेच झंडू कुमार यांनी पुरुषांच्या हेवीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंग प्रकारात कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकसंख्येत भर घातली.

यापूर्वी भारताची सर्वोत्तम कामगिरी २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत झाली होती. त्या स्पर्धेत भारताने पॅरा प्रकारात दोन पदके जिंकली होती. पॅरा टेबल टेनिसमध्ये भावना पटेल यांनी सुवर्णपदक, तर सोनलबेन पटेल यांनी कांस्यपदक जिंकले होते. पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये सुधीर यांनी सुरुवातीला सुवर्णपदक पटकावले होते, मात्र उत्तेजक द्रव्यविरोधी नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांचे सुवर्णपदक रद्द करण्यात आले होते. यंदाच्या स्पर्धेत भारतीय पॅरा खेळाडूंनी सात पदकांची ऐतिहासिक कमाई करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारताच्या कामगिरीला नवे शिखर गाठून दिले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur