Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
फळा, प्रयोग अन् स्वप्नांना पंख... ध्येयवादी शिक्षका अरुणा कडू

फळा, प्रयोग अन् स्वप्नांना पंख... ध्येयवादी शिक्षका अरुणा कडू

नागपूर

Aruna kadu उपक्रमशीलता, कार्यमग्नता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची ध्येयवृत्ती अंगी बाळगून गेल्या 32 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अरुणा कडू यांच्या कार्याला नवीन नंदनवन येथील ज्योतिबा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मुख्याध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर नवी झळाळी मिळाली आहे.

2024 मध्ये बदली होऊन त्या या विद्यालयात रुजू झाल्या. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासोबतच त्यांच्यात सामाजिक जाणीव, वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, उद्योजकता आणि स्वावलंबनाची भावना निर्माण करण्यासाठी त्या सातत्याने विविध उपक्रम राबवत आहेत.

अरुणा कडू यांच्या सेवेची सुरुवात 1 डिसेंबर 1993 रोजी भगवती गर्ल्स हायस्कूल येथून झाली. तेथे त्यांनी मुलींच्या शैक्षणिक विकासासाठी विशेष कार्य केले. विद्यार्थिनींच्या ज्ञानात भर पडावी यासाठी लोकमत मुद्रणालय, बुटीबोरी तसेच रमण विज्ञान केंद्र, नागपूर अशा विविध ठिकाणी क्षेत्रभेटींचे आयोजन केले. विज्ञान प्रदर्शनेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवून त्यांना विज्ञानाच्या नवनवीन प्रतिकृती तयार करण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःही विज्ञान प्रतिकृती तयार करून विज्ञान प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतला. शाळेच्या दर्शनी भागातील फलकलेखनाचीही त्यांना विशेष आवड असून, गेल्या 32 वर्षांतील त्यांच्या कार्याचा मागोवा घेतल्यास अनेक उपक्रम लक्षवेधी ठरतात.

ज्योतिबा माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापकपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी यासाठी त्यांनी विविध उपक्रमांना गती दिली. पर्यावरण संवर्धनाशी संबंधित चित्रे, कलाकृती आणि कल्पक संदेश देणाऱ्या विविध रचनांनी शाळेच्या भिंती बोलक्या केल्या. विद्यार्थ्यांना वारली पेंटिंग करण्यासाठी प्रोत्साहन देत त्यांना आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.

नवोपक्रम राबविले

शालेय व्यवस्थापन, 'वाचू आनंदें', आहारविषयक कार्यशाळा, 'बेस्ट फ्रॉम वेस्ट', कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प, रानभाज्यांची ओळख व लागवड, परसबाग निर्मिती, 'सफाई अपनाओ, बिमारी भगाओ', प्लास्टिक हटाव आणि कापडी पिशवीचा वापर, स्वच्छता प्रभातफेरी, परिसरातील नागरिकांना aruna kadu स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी पथनाट्य आणि त्याद्वारे जनजागृती, तसेच पथनाट्य लेखन, मतदार जागृती अभियान आणि डिजिटल साक्षरतेबाबत पालकांचे समुपदेशन असे अनेक नवोपक्रम शाळेत सातत्याने राबविले जात आहेत.

रस्त्यावरील वाढते अपघात कमी करण्याच्या उद्देशाने शाळेत रोड सेफ्टी वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले. वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत प्रात्यक्षिके आणि व्याख्याने घेण्यात आली. विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी व सुदृढ राहावे यासाठी आरोग्य शिबिर आयोजित करून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत विद्यार्थ्यांची तपासणी व उपचार करून घेण्यात आले. शाडूच्या मातीपासून पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. त्याचबरोबर पर्यावरणपूरक गणपती डेकोरेशन स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले.

'वृक्ष वाढवा, वृक्ष जगवा' हा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यासाठी बीजगोळे कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी बीजगोळे तयार केले. विविध प्रसंगी शाळेत येणाऱ्या अतिथींना हे बीजगोळे भेट देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय रुजावी या उद्देशाने 'विद्यार्थी आधार बचत बँक' निर्माण करण्यात आली असून, तिचे संचालन विद्यार्थ्यांनीच केले.

उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार

कोविडच्या काळात 'शाळा बंद, पण शिक्षण सुरू' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविताना कडू यांनी ऑनलाइन तसेच ऑफलाइन शिक्षणाची व्यवस्था सुरू ठेवली. त्यांनी स्वतः शैक्षणिक व्हिडिओ तयार केले. विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे मनोबल वाढावे यासाठी समुपदेशन केले. विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीने शाळाबाह्य बालकांना शाळेत प्रवेशित केले. मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व पालकांना समजावून सांगितले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची मानसिकता निर्माण व्हावी यासाठी 'टाकाऊतून टिकाऊ' हा उपक्रम राबविला. कोरोना काळातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार' देऊन गौरविले.

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP 2020) विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे आणि डिजिटल लर्निंगला प्रोत्साहन देणे या उद्देशाने सामाजिक सहभागातून शाळेत STEAM LAB उभारण्यात आली. या प्रयोगशाळेत इयत्ता 6 ते 9 मधील विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, कोडिंग आणि इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण निःशुल्क दिले जाते. शाळेची वाढलेली गुणवत्ता आणि विविध उपक्रमांतील विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना निःशुल्क व्हॉलीबॉल प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले असून, त्यातून चांगले खेळाडू तयार होत आहेत. मुलांसाठी महाज्योती या शासनमान्य संस्थेच्या माध्यमातून निःशुल्क आत्मरक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षित कोचकडून कराटे, योगा आणि आज ध्यानाचे प्रशिक्षण दिले जात आहे. शाळेचे व्यवस्थापन उत्तमरित्या सांभाळत विद्यार्थ्यांची अध्ययनक्षमता उंचावणे हे ध्येय समोर ठेवून कडू शैक्षणिक साहित्यनिर्मिती करून त्याचा प्रभावी वापर करण्यास तसेच अॅक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगला प्रोत्साहन देण्यात अग्रेसर आहेत.

शाळेची द्वितीय स्थानी निवड

शाळेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा प्रकल्प सादर करण्यात आला. नागपूर शहरातील 1596 शाळांमध्ये या शाळेची द्वितीय स्थानी निवड झाली. या उल्लेखनीय यशात अरुणा कडू यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या कार्याला संस्थेचे अध्यक्ष व सचिव तसेच शिक्षण विभागातील अधिकारी सातत्याने प्रोत्साहन देत असतात.

शैक्षणिक क्षेत्रासोबतच साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातही अरुणा कडू यांनी आपला ठसा उमटविला आहे. त्यांनी 'ठाव' या काव्यसंग्रहाचे लेखन केले असून, ज्येष्ठ साहित्यिक श्री. श्रीपाद सबनीस यांच्या हस्ते राज्यस्तरीय साहित्य संमेलनात या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेख आणि कविता प्रकाशित झाल्या आहेत. विविध आस्थापनांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अनेक कार्यक्रमांत त्यांनी 60 पेक्षा अधिक वेळा सूत्रसंचलन केले आहे. साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रज्ञा बहुउद्देशीय संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने त्यांना 'नवदुर्गा पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.अरुणा कडू या विदर्भ लेखिका संस्थेच्या उपाध्यक्ष असून 'मायमराठी ऐ नक्षत्र प्रतिष्ठान'मध्ये संघटक म्हणून कार्यरत आहेत. ग्लोबल फाउंडेशन, पुणे या संस्थेचा 'ज्ञानदीप पुरस्कार' त्यांना जाहीर झाला आहे. तसेच बी द चेंज फाउंडेशन, अहिल्यानगर यांच्या वतीने त्यांना 'आदर्श प्रिन्सिपल अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले आहे.

शिक्षण, विज्ञान, पर्यावरण, आरोग्य, सामाजिक जाणीव, क्रीडा, डिजिटल शिक्षण, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्र अशा विविध आयामांना स्पर्श करणारे अरुणा कडू यांचे कार्य विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवणारे आहे. उपक्रमशीलता आणि ध्येयवादी दृष्टिकोनातून शाळेच्या विकासाला दिशा देतानाच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू असून, त्यांच्या कार्यामुळे ज्योतिबा माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची गुणवत्ता आणि शैक्षणिक वाटचाल अधिक बळकट होत आहे.

सौजन्य : जामुवंत वांदे संपर्क मित्र

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur