Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोहीच्या जलकुंभाला चार महिन्यातच गळती

पोहीच्या जलकुंभाला चार महिन्यातच गळती

ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट

अचलपूर,

Pohi Water Reservoir महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत अचलपूर तालुक्यातील पोही येथे उभारण्यात आलेल्या 'सपन' पाणी पुरवठा योजनेच्या जलकुंभाच्या बांधकामावर आता संशयाचे गडद सावट पसरले आहे.

लाखो रुपयांचा निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या या जलकुंभाला केवळ तीन ते चार महिन्यांतच गळती लागल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली. मात्र प्रत्यक्षात नव्याने उभारण्यात आलेल्या जलकुंभाची अवस्था पाहून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. जलकुंभाच्या भिंतींमधून आणि विविध भागांतून पाणी झिरपत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. एवढ्या कमी कालावधीत जलकुंभाला गळती लागणे म्हणजे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा पुरावा असल्याची चर्चा गावात सुरू आहे.

ग्रामस्थांच्या मते, काम करताना दर्जाहीन साहित्याचा वापर करण्यात आला का, गुणवत्ता नियंत्रणाची प्रक्रिया केवळ कागदोपत्रीच राहिली का, तसेच संबंधित यंत्रणेने बांधकामाची योग्य तपासणी केली होती का, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. शासनाचा निधी खर्च करून उभारलेल्या सार्वजनिक प्रकल्पांची अशी दुरवस्था होत असेल तर जनतेच्या पैशाचा नेमका हिशोब कोण देणार, असा सवालही नागरिकांकडून केला जात आहे. याहून धक्कादायक बाब म्हणजे जलकुंभावरील शिडीची अवस्था. शिडी तारांनी बांधून ठेवण्यात आली असून तिला तात्पुरत्या स्वरूपात पाचर्‍यांचा आधार देण्यात आल्याचे दिसून येत आहे. ही शिडी अत्यंत डळमळीत असल्याने जलकुंभावर चढ-उतार करणार्‍या कर्मचार्‍यांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक सुविधांच्या कामांमध्ये असा हलगर्जीपणा कसा काय खपवून घेतला गेला, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. पोहीतील जलकुंभ प्रकरणात प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि दोषींवर कारवाई करून शासनाच्या निधीचा हिशोब द्यावा, अशी मागणी आता अधिक तीव्र होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur