Dailyhunt
प्रा. दीपश्री पाटील करणार 'स्‍वयंरचित ८१ बंदिशींचे सादरीकरण

प्रा. दीपश्री पाटील करणार 'स्‍वयंरचित ८१ बंदिशींचे सादरीकरण

नागपूर,

Presentation of 81 bandishe शास्त्रीय संगीत क्षेत्रात एक आगळावेगळा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालयाच्या संगीत विभाग प्रमुख प्रा. दीपश्री पाटील सज्ज झाल्या आहेत.

शनिवार, ४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात त्या सलग ८१ स्वयंरचित बंदिशींचे सादरीकरण करणार आहेत.सखे सोबती फाउंडेशन आणि सारस्वत संगीत विद्यालय, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची संकल्पना स्वतः प्रा. दीपश्री पाटील यांची असून, त्यांनी सुमारे ३६ विविध रागांमधील ८१ बंदिशींची निवड केली आहे. या सादरीकरणात त्यांच्यासोबत त्यांच्या ४० विद्यार्थिनीही सहभागी होणार आहेत, ज्यामुळे हा कार्यक्रम अधिक भव्य आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.

'सर्वाधिक स्वयंरचित शास्त्रीय बंदिशींचे सलग सादरीकरण करणारी महिला प्राध्यापक' या श्रेणीत या उपक्रमाची नोंद प्रतिष्ठित 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' तसेच 'एशिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये केली जाणार आहे. त्यामुळे नागपूरच्या संगीत क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब ठरणार आहे.प्रा. दीपश्री पाटील यांनी यापूर्वीही यमन रागामध्ये सर्वाधिक बंदिशी रचण्याचा विक्रम आपल्या नावावर केला असून, त्यांच्या या नव्या प्रयत्नाकडे संगीतप्रेमींचे लक्ष लागले आहे. सातत्यपूर्ण साधना आणि सर्जनशीलतेच्या जोरावर त्या आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहेत.या अनोख्या संगीत सोहळ्याला नागपूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur