Dailyhunt
प्रभारी व्यवस्थेच्या विळख्यात विद्यापीठ प्रशासन

प्रभारी व्यवस्थेच्या विळख्यात विद्यापीठ प्रशासन

नागपूर,

University administration under the charge system राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला चार महिन्यांपूर्वी डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या रूपाने नियमित कुलगुरू मिळाल्यानंतर प्रशासनात स्थैर्य येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

मात्र, आजही विद्यापीठातील बहुतांश महत्त्वाची पदे प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरवशावरच सुरू असल्याने प्रशासकीय कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गेल्या दोन वर्षांपासून विविध पदे रिक्त असून, नियमित नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू होईल अशी आशा होती. मात्र, चार महिन्यांच्या कालावधीत एकाही पदावर कायमस्वरूपी अधिकारी नेमण्यात आलेला नाही. यामुळे विद्यापीठ वर्तुळात नाराजीचे वातावरण असून, विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, कुलसचिव डॉ. राजू हिवसे हे लवकरच निवृत्त होणार असल्याने या पदाच्या भरतीची प्रक्रियाही तातडीने सुरू करावी लागणार आहे. आधीच रिक्त पदे न भरल्याने, कुलसचिव पदाची नियुक्ती वेळेत होईल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.प्र-कुलगुरू हे अत्यंत महत्त्वाचे पद असून त्याची निवड करण्याचा अधिकार कुलगुरूंना असतो. २३ मार्च रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या निवडीचा विषय होता; मात्र कोणतेही कारण न देता बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळे ही निवड अद्यापही प्रलंबित आहे.

परीक्षा विभागातही अनिश्चितता कायम आहे. हिवाळी परीक्षांचे निकाल रखडल्यामुळे प्रभारी परीक्षा संचालकांचा प्रभार बदलण्यात आला असला, तरी नियमित नियुक्तीबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही. तसेच विद्यार्थी विकास विभागासारखे महत्त्वाचे विभागही दोन वर्षांपासून प्रभारींच्याच ताब्यात आहेत.याशिवाय, चारही विद्याशाखांचे अधिष्ठाता पदेही रिक्त असून त्यासाठी आवश्यक असलेली भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. परिणामी, विद्यापीठातील प्रशासकीय कामकाज आणि विद्यार्थीहिताच्या योजना प्रभावित होत असल्याचा आरोप अधिसभा सदस्यांकडून केला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur