Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रतिसरकाराच्या शौर्यगाथेची ऐतिहासिक कहाणी मोठ्या पडद्यावर

प्रतिसरकाराच्या शौर्यगाथेची ऐतिहासिक कहाणी मोठ्या पडद्यावर

मुंबई

Patri sarkar भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी अध्याय रुपेरी पडद्यावर साकारण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले असून, आगामी मराठी चित्रपट 'पत्री सरकार १९४२'चे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

पोस्टर प्रदर्शित होताच चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या प्रतिसरकाराच्या ऐतिहासिक संघर्षाची शौर्यगाथा या चित्रपटातून उलगडणार आहे.

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये हातात बंदूक घेतलेला क्रांतिकारक, घोड्यावर स्वार झालेला योद्धा आणि ब्रिटिश सैनिकांशी सुरू असलेला संघर्ष प्रभावीपणे साकारण्यात आला आहे. पार्श्वभूमीतील धूर, ज्वाळा आणि युद्धजन्य वातावरणामुळे त्या काळातील संघर्षाची तीव्रता अधिक ठळकपणे जाणवते. पोस्टरवरूनच हा चित्रपट भव्य ऐतिहासिक अनुभव देणारा ठरेल, अशी छाप निर्माण झाली आहे.

१९४२ साली क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा प्रांतात प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश सत्तेला मोठे आव्हान दिले होते. त्यांच्या प्रेरणेने क्रांती अग्रणी जी. डी. लाड, क्रांतिवीर नागनाथ नायकवडी यांच्यासह हजारो स्वातंत्र्यसैनिकांनी सावकारशाही, ब्रिटिश सत्ता आणि अन्यायाविरोधात लढा उभारला. इतिहासात फारशी नोंद न झालेल्या या अज्ञात क्रांतीवीरांच्या पराक्रमाची कथा 'पत्री सरकार १९४२'मधून प्रेक्षकांसमोर साकारली जाणार आहे.

भागीरथी मोशन patria srkar पिक्चर प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती विशाल गोविंदराव जाधव यांनी केली आहे. चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, गीतलेखन आणि संगीताची जबाबदारी मनीष अनसुरकर यांनी सांभाळली आहे. संकलन कर्तव्य मोकल यांनी केले असून, छायाचित्रण संदीप वाटवे, सुमेध मराठे आणि परमहंस पाठक यांनी केले आहे. चित्रपटाला सौरभ लता शिवकुमार यांचे पार्श्वसंगीत लाभले असून, विशाल जाधव, गोरख गुंजाळ, अनन्या नाईक आणि आनंद मेनन यांनी चित्रपटातील गाण्यांना आवाज दिला आहे.चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक मनीष अनसुरकर म्हणाले, "ब्रिटिशांविरोधात पेटलेल्या क्रांतीचं वास्तव आणि त्या काळातील संघर्ष पडद्यावर प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर साकारताना मोठी जबाबदारी होती. मात्र संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळे हा प्रवास शक्य झाला. पोस्टरनंतर आता लवकरच टीझर आणि ट्रेलरमधून चित्रपटातील आणखी अनेक पैलू प्रेक्षकांसमोर येतील."

महाराष्ट्राच्या मातीत पेटलेल्या स्वातंत्र्यलढ्याची आणि अज्ञात क्रांतीवीरांच्या अद्वितीय पराक्रमाची गाथा सांगणारा 'पत्री सरकार १९४२' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाला असून, पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur