Dailyhunt
राज्यमंत्री नाईकांच्या पाठपुराव्याने अतिक्रमकांचे घराचे स्वप्न पूर्णत्वाकडे..!

राज्यमंत्री नाईकांच्या पाठपुराव्याने अतिक्रमकांचे घराचे स्वप्न पूर्णत्वाकडे..!

तभा वृत्तसेवा

पुसद,

Indranil Naik शहरातील अतिक्रमकांसाठी दिलासादायक अशी महत्वाची घडामोड समोर आली असून, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अतिक्रमकांना लवकरच आखीव पत्रिका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

नगर परिषद क्षेत्रातील अतिक्रमकांना घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी अतिक्रमण नियमानुकूल करण्याची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती. या प्रक्रियेत जागेची मोजणी, तसेच नगररचना नियमावलीनुसार भूखंडांच्या अभिन्यासाला मंजुरी घेणे आवश्यक होते. त्यानुसार पुसद शहरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमकांच्या भूखंडांचे मोजमाप करून अभिन्यास तयार करण्यात आले आणि ते नगररचना विभागाकडे सादर करण्यात आले होते.

यापैकी शिवाजी वार्ड व नवलबाबा वार्ड या दोन प्रभागांच्या अभिन्यासाला नगर रचना विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीच्या आधारे संबंधित नागरिकांना आखीव पत्रिका देण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. उर्वरित प्रभागांबाबतही नियमानुकूल कार्यवाही सुरू असून लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

या संदर्भात प्रतिक्रिया देताना नप अध्यक्ष मोहिनी नाईक यांनी, नगर परिषद निवडणुकीदरम्यान दिलेला शब्द पाळण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. उर्वरित प्रभागांमधील कामे देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले.

या निर्णयामुळे पुसद शहरातील अनेक कुटुंबांचे स्वतःच्या घराचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या उंबरठ्यावर आले आहे. या लोकाभिमुख व लोकहिताच्या निर्णयासाठी घरकुल लाभार्थ्यांच्या वतीने मोहिनी नाईक यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व महसूल विभागाचे आभार मानले.

तसेच मंजुरी मिळालेल्या अभिन्यासातील लाभार्थी आता प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतील अशीही माहिती त्यांनी दिली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur