Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रशियन हल्ल्यात कीवमध्ये ९ ठार, २२ जखमी

रशियन हल्ल्यात कीवमध्ये ९ ठार, २२ जखमी

कीव,

9 killed in Russian attack in Kiev रशियाने युक्रेनची राजधानी कीववर पुन्हा एकदा क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे मोठा हल्ला केला असून, या हल्ल्यात ९ नागरिकांचा मृत्यू झाला तर २२ जण जखमी झाले आहेत.

हल्ल्यानंतर राजधानीतील अनेक निवासी आणि व्यावसायिक इमारतींचे नुकसान झाले असून विविध भागांत आग लागल्याने बचाव पथकांना तातडीने घटनास्थळी धाव घ्यावी लागली.युक्रेनच्या राज्य आपत्कालीन सेवेनुसार, कीवच्या सोलोमियांस्की जिल्ह्यात पाच मजली निवासी इमारतीवर अवशेष कोसळल्याने आग लागली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला, तर दोन लहान मुलांसह आठ जण जखमी झाले. बचाव पथकांनी इमारतीच्या वरच्या मजल्यांवर अडकलेल्या ३५ नागरिकांची सुखरूप सुटका केली.

डार्नित्स्की जिल्ह्यात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे घरे, वाहने तसेच प्रशासकीय आणि इतर इमारतींचे मोठे नुकसान झाले. या भागात सात जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. शेवचेन्किव्हस्की जिल्ह्यातील एका अनिवासी इमारतीलाही लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यानंतर लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी बचाव पथकांना मोठे प्रयत्न करावे लागले.या हल्ल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी रशियन हल्ल्यांचा सामना करण्यासाठी अमेरिका आणि इतर पाश्चात्त्य देशांनी अधिक पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणाली उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली. या संदर्भात त्यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्याशी चर्चा केली असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेली अलीकडील भेट सकारात्मक आणि उपयुक्त ठरल्याचे त्यांनी सांगितले.

युक्रेनच्या विविध भागांवर रशियाने मोठ्या प्रमाणात बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांनी कीववर हा ताजा हल्ला झाला आहे. याआधीच्या हल्ल्यात १० नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर ५० हून अधिक जण जखमी झाले होते. त्याचवेळी, एका रशियन क्षेपणास्त्राने पोलंडच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्याचे वृत्तही समोर आले आहे. हल्ल्यावेळी बंकरमध्ये आश्रय घेतलेल्या ६४ वर्षीय ल्युडमिला नाकोनेचना यांनी सांगितले की, पहाटे सुमारे दीड वाजता झालेल्या जोरदार स्फोटांनी त्यांना जाग आली. स्फोटामुळे त्यांच्या घराची बाल्कनी आणि खिडक्यांचे नुकसान झाले. रशियाकडून होणारे हल्ले पूर्वीपेक्षा अधिक वारंवार होत असून त्यामुळे नागरिकांवर मानसिक ताण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur