Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

समृद्धी महामार्गावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

वाशीम,

Samruddhi expressway समृद्धी महामार्गावर कारंजा शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विश्रांतीसाठी थांबलेल्या एका बँक व्यवस्थापकाला अन् त्यांच्या पत्नीला तलवारीचा व लोखंडी सळईचा धाक दाखवून लुटणार्‍या आंतरजिल्हा दरोडेखोरांच्या टोळीचा वाशीमच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि कारंजा शहर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील पाच दरोडेखोरांना अटक करण्यात आली.

याबाबत फिर्यादी प्रशांत युधिष्ठिर रंजन (वय ३८) रा. बेलाड रिटोला, जि. पाटणा, बिहार हे सध्या यूको बँक, वैकुंठपूर (झोन रायपूर) येथे शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. २७ जुलै रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास ते पत्नी अर्चना रंजन यांच्यासह वैयक्तिक कारने (जेजी-०५ आरजे-०४०७) छत्रपती संभाजीनगरहून रायपूरकडे परत जात होते.कारंजा परिसरात आले असता त्यांनी महामार्गाच्या कडेला कार उभी करून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. काही वेळातच चार अज्ञात तरुण कारजवळ आले. महामार्ग पोलिस असल्याचे सांगत एकाने खिडकीची काच खाली करण्याचा इशारा केला. प्रशांत यांनी काच खाली करताच दरोडेखोरांनी अर्चना यांच्या बाजूचा दरवाजा उघडून तलवारीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या हातातील पर्स हिसकावून घेतली. पर्समध्ये ५ हजार रुपयांची रोकड, २ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या कानातील बाळ्या, एटीएम, पॅन कार्ड आणि मुलांची आधार कार्ड होती. प्रशांत रंजन यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ कार सुरू केली आणि घटनास्थळावरून थेट नागपूर गाठून पोलिसांत आपबीती कथन केली.

कारंजा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुधाकर आडे आणि कारंजा शहरचे पोलिस निरीक्षक अमर चोरे यांनी समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान , खबर्‍याकडून गुप्त माहिती नुसार टोळीतील मुख्य सूत्रधार भैया उर्फ हर्षद पांडुरंग साबळे (वय २६ ) रा. चिखली, जि. बुलढाणा याला पोलिसांनी प्रथम ताब्यात घेतले. खाकीचा धाक दाखवताच त्याने पोपटासारखी जबानी देत आपल्या इतर चार साथीदारांची नावे सांगीतली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चेतन संजय माने (वय २५, रा. बोरगाव वसू, ता. चिखली), ओम सुरेश सपकाळ (वय २०, रा. बोरगाव वसू, ता. चिखली), धनंजय उजालसिंग कमळीक (वय २५, रा. देवठाणा, ता. चिखली), गोपाल श्रीकिसन मोरे (वय २६, रा. देवठाणा, ता. चिखली) या चार आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून पोलिसांनी ४,७५० रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली हुंदाई वर्ना कार लोखंडी सळई, २ नकली पिस्तूल आणि ५ मोबाईल फोन जप्त केले आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल क्षीरसागर व मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सुधाकर आडे, पोलिस निरिक्षक अमर चोरे, सपोनि जगदीश बांगर, योगेश धोत्रे, पोउपनि निलेश जाधव, विशाल बोरकर, स्वप्नील चव्हाण, पोहवा गजानन झगरे, सुरज खडके, ज्ञानदेव मात्रे, आशिष बिडवे, महेश वानखेडे, पोअं गोपाल चौधरी, अमोल इरतकर, चापोअं सुनिल तायडे, पोहवा गणेश जाधव, मयुरेश तिवारी, उमेशकुमार बिबेकर, अजय धनकर, पोकॉ नितीन पाटील, अनिस निमसुरवाले, अमित भगत, मोहम्मद परसुवाले यांच्या पथकाने केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur