कल्पना सरोज
World imagination एखाद्या परिकथेप्रमाणे आभासी वाटणारी कल्पना सरोज यांची जीवनगाथा म्हणजे शून्यातून हस्तिदंती मनोरे पादाक्रांत करणारी एक सत्य घटना आहे. महिला उद्योजकांना दिला जाणारा राजीव गांधी पुरस्कार प्राप्त तसेच २०१३ यावर्षी पद्मश्री पुरस्कार मिळविणाऱ्या सरोज यांना यावर्षीच्या १५ ऑगस्ट रोजी भारत मंडपम येथे निमंत्रित करण्यात आले होते.
घरापासून १० किलोमीटर दूर शाळेत अनवाणी पायी चालत जाणारी लाजरी कल्पना आज पाच अब्ज रुपयांच्या साम्राज्याची सम्राज्ञी आहे, हे येथे उल्लेखनीय.
स्वकष्टाने अब्जावधी बनणाऱ्या कल्पना सरोज यांची कथा सुरू होते ती विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर या लहानशा खेड्यातून. पोलिस हवालदार महादेवराव यांच्याकडे जन्म घेतलेली कल्पना खरंच कल्पनातीत आहे. वडिलांना शिक्षणाचे महत्त्व पटल्याने आपली मुलगीही शिकावी असे वाटले. वयाच्या १२ व्या वर्षी लग्न होऊन कल्पना मुंबईत दाखल झाली. मात्र सासरी झालेल्या अतिव छळामुळे वडिलांनी तिला माघारी आणले व परत शिक्षणाला सुरुवात झाली. ती पुन्हा मुंबईत दाखल झाली. दोन रुपये रोजंदारीवर शिवणकाम करणे सुरू केले. त्या सांगतात, आयुष्यात कधीही आगगाडी पाहिली नव्हती आणि मुंबईत आगगाडीला पर्याय नव्हता. पूर्ण गच्च भरलेल्या गाडी चढताना अनेकदा मी खाली पडले; त्यातूनही मार्ग काढत जगणे सुरू ठेवले...
वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी धाडसी पाऊल उचलले. बँकेतून ५० हजारांचे ऋण घेऊन फर्निचरचा व्यवसाय सुरू केला. नंतर स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री, स्टील कारखाना, साखर कारखाना अशी कमान चढत गेल्या. १९६७ मध्ये मुंबईत त्यांनी एक जागा घेतली; ती वादग्रस्त असल्यामुळे तिची किंमत कमी होती. भाडेकरू जागा रिकामी करीत नव्हते; पण त्यांना विश्वास होता की, हे काम त्या निश्चितच करू शकतील. कोर्टकचेरीच्या चकरा मारीत शेवटी त्यांनी ती जागा मिळवली व त्या जागी 'कोहिनूर प्लाझा' नावाची इमारत उभी केली. त्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले. कालांतराने चांगली किंमत येताच कोहिनूर प्लाझा विकून तो पैसा इतर उद्योगाकडे वळविला. दरम्यान, त्यांनी दुसरा विवाह केला. एक मुलगा व एक मुलगी पदरात टाकून पती वारला. वैवाहिक जीवन त्यांच्या नशिबातच नव्हते. नंतरच्या काळात कमानी ट्यूब मर्यादित कंपनीकडून मदत मागण्यात आली. हा कारखाना १७ वर्षांपासून बंद होता. एकेकाळी रामजीभाई कमानी यांनी महात्मा गांधी, पंडित नेहरूंचे उद्योगशील भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी टाटा, बिर्ला यांच्यासोबतच या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. तीन देशात चालणाऱ्या या कंपनीचे ब्रासचे व तांब्याचे ट्यूब जगप्रसिद्ध आहेत, परंतु कौटुंबिक संघर्षात कंपनी डबघाईस आली व एसटीसीए या कायद्याने तिला आजारी कंपनीच्या यादीत टाकले. ज्या कंपनीवर १.६ अब्ज रुपये कर्ज आहे व लिक्विडेशनच्या १४० कायदेशीर कारवाया ज्यामध्ये सुरू आहेत अशी ती कंपनी होती. त्यांनी मजुरांना मदत व्हावी म्हणून ती कंपनी विकत घेण्याचे ठरवले. २००२ साली १६० करोडचे कर्ज घेण्याचे ठरविले. सुमारे ५० करोड रुपये कामगारांचे वेतन थकित असलेली कंपनी त्यांनी विकत घेतली. सरकारने तीन वर्षाची मुदत दिली असताना त्यांनी केवळ तीन महिन्यात सर्व मजुरांचे वेतन शिवाय २.४० करोड रुपये त्यांचा भविष्य निधी देऊ केला. कारण मजुरांचा विश्वास प्राप्त करणे गरजेचे होते. मार्च २००६ मध्ये कमानी ट्यूब टायर्स लिमिटेडचे नूतनीकरण कोर्टाने मान्य केले. केटीएल २००९ फेब्रुवारी रोजी मुंबईतील वाडा या उपनगरीत सुरू झाले. जर्मनीतून आणलेल्या अत्याधुनिक मशिनरी वापरून त्यांनी उत्पादन १० हजार टन प्रतिवर्षावर आणले. आज अनेक प्रतिष्ठानच्या त्या मालकीण आहेत. साईकृपा साखर कारखाना अहमदनगर, कल्पना सरोज अँड असोसिएट्स, कल्पना एंटरप्राइजेस अशी अनेक प्रतिष्ठाने त्या चालवीत आहेत. सामाजिक भान ठेवून दरवर्षी २००० विद्यार्थ्यांना वसतिगृह वाचनालयाच्या सुविधांसह आर्थिक मदतही करतात. आदिवासींच्या उद्धारासाठी त्या प्रयत्न करीत आहेत. जाती निर्मूलनासाठी कार्य करतात. माझे भांडवल म्हणजे माझे लोक असे त्या म्हणतात. ज्याप्रमाणे कल्पना सरोज यांनी सर्व संकटांवर मात करून स्वतःचे स्थान निर्माण केले तसेच इतरही महिलांनी स्वतःला कमजोर न समजता स्वतःच्या दुःखाला न कुरवाळता त्यावर विजय मिळवून यशाचे सीमोल्लंघन करावे, हाच संदेश त्यांच्या चरित्रातून मिळतो.
स्मिता रवीन्द्र बोकारेनागपूर । ९४२४०७६३६२

