Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तिलक-नितीशची कमाल! १७ वर्षांचा विक्रम मोडला

तिलक-नितीशची कमाल! १७ वर्षांचा विक्रम मोडला

क्राइस्टचर्च,

Tilak-and-nitish न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने चार गडी राखून विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. या विजयात तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

या दोघांनी सातव्या गड्यासाठी ६९ धावांची नाबाद भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला. या कामगिरीसह त्यांनी तब्बल १७ वर्षांपासून कायम असलेला भारतीय विक्रम मोडला.

क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारतासमोर १८१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था एकवेळ ११२ धावांवर सहा गडी बाद अशी झाली होती. त्यामुळे सामना अडचणीत सापडला होता. मात्र, तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी संयमाने फलंदाजी करत संघाला सावरले. दोघांनी अखेरपर्यंत टिकून राहत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

या भागीदारीमुळे तिलक आणि नितीश यांनी इरफान पठाण व युसूफ पठाण या बंधूंचा विक्रम मागे टाकला. २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळताना पठाण बंधूंनी सातव्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली होती. भारतीय संघाने यशस्वी केलेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय धावांच्या पाठलागात सातव्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी होती. आता न्यूझीलंडविरुद्ध ६९ धावांची भागीदारी करत तिलक आणि नितीश यांनी नवा भारतीय विक्रम प्रस्थापित केला.

पूर्ण सदस्यत्व असलेल्या देशांमधील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत यशस्वी धावांच्या पाठलागादरम्यान सातव्या विकेटसाठीच्या भागीदारीचा विचार करता, बांगलादेशच्या अफिफ होसेन आणि मोसादेक होसेन यांच्या नावावर सर्वोच्च ८२ धावांची भागीदारी आहे. त्यांनी २०१९ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध ही कामगिरी केली होती. श्रीलंकेच्या चमिका करुणारत्ने आणि दसुन शनाका यांनी २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६९ धावांची भागीदारी केली होती. आता तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनीही न्यूझीलंडविरुद्ध ६९ धावा करत या यादीत स्थान मिळवले आहे.

दरम्यान, तिलक वर्माने या सामन्यात नाबाद ५१ धावांची खेळी करत आणखी एक उल्लेखनीय कामगिरी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना तो नाबाद राहिलेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने सातत्याने विजय मिळवला आहे. आतापर्यंत तिलक १२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत नाबाद राहिला असून, या सर्व सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. त्यामुळे या बाबतीत त्याने हार्दिक पांड्यालाही मागे टाकले आहे. हार्दिक ११ सामन्यांत नाबाद राहिला असून, त्यापैकी भारताने १० सामने जिंकले आहेत.

या यादीत माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनी आघाडीवर आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना धोनी २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत नाबाद राहिला होता. त्यापैकी १५ सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळवला. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील तिलकच्या खेळीमुळे त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. त्याचबरोबर नितीश कुमार रेड्डीसोबत केलेल्या भागीदारीने भारतीय संघाला मालिकेत दुसरा विजय मिळवून दिला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur