Monday, 13 Sep, 6.02 am तरुण भारत नागपूर

होम
उत्सवांचा उद्देश लक्षात राहावा!

कानोसा

- अमोल पुसदकर

मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्यातल्या त्यात आमचा देश हा जगातील प्राचीन मानव सभ्यतेपैकी एक असल्यामुळे आम्ही कशाचा आनंद साजरा करावा, हे फार पूर्वी शिकलो. तो आनंद साजरा करणे म्हणजे उत्सव साजरा करणे होय. उत्सव म्हणजे एखाद्या गोष्टीचे स्मरण आणि त्या प्रीत्यर्थ त्याचा आनंद साजरा करणे. त्यामागे अनेकानेक प्रकारच्या प्रेरणासुद्धा आहेत. अनेक प्रकारचे संदेश त्यामागे आहेत. लोकांनी एकत्र यावे, आपल्या समाजाचे, देशाचे, संस्कृतीचे चिंतन करावे, आमच्या समाजासमोर काय आव्हान आहेत, काय संधी आहे, याचा विचार करावा हाही उत्सवामागील एक उद्देश आहे. दैनंदिन जीवनामध्ये माणूस हा एक दुसर्‍यापासून खूप दूर गेलेला असतो.

त्यामुळे सगळे एकत्र यावे, परिचय व्हावा, मित्रता वाढावी आणि त्यातून अतिशय चांगले संबंध परस्परांमध्ये निर्माण व्हावेत, ही उत्सवांमागील भावना आहे. यातून व्यक्ती, कुटुंब, समाज व राष्ट्र या सर्वांनाच एकमेकांशी जोडण्याचा विचार आहे. एवढेच नव्हे तर निसर्ग, पशु-पक्षी या सर्वांचाही विचार उत्सव साजरा करण्यामागे आहे. आमच्या देशातील सर्वच उत्सव हे ऋतू, निसर्गामध्ये होणारे बदल आणि त्यातून संपूर्ण सृष्टीला होणारा आनंद याच्याशी निगडित आहेत. आमच्या देव आणि देवींच्या कल्पनासुद्धा आमच्या आजूबाजूच्या सर्वच घटकांशी आम्हाला जोडणार्‍या आहेत. आणि म्हणून उत्सव हे व्यक्तीला, समाजाला व सर्वांनाच प्रिय वाटतात. आमचे अनेक दु:ख, आमच्या अनेक समस्या यांना घेऊन जरी आम्ही जीवन जगत असलो तरीही उत्सव हे आम्हाला काही काळ त्या सर्व गोष्टींना विसरायला लावतात. पुन्हा एकदा नवीन उभारी, लढण्याची, जगण्याची नवी उमेद या उत्सवामधून आम्हाला मिळत असते. आता गणेश उत्सव सुरू आहे.

ज्या काळात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली त्यावेळेस 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,' सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? अशा पद्धतीच्या विविध गर्जना करून संपूर्ण समाजाला इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधामध्ये जागृत करणारे, सक्रिय करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा उद्देश लोकांना एकत्र आणणे व देशकार्याला लावणे, हाच होता. एकटा माणूस कदाचित घाबरेल परंतु ज्या वेळेला लोक एकत्र येतात त्या वेळेला संघटनेची शक्ती त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. ते एकत्र आले पाहिजे. उद्देश कुठला तरी असू शकतो. ज्या वेळेला गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोक एकत्र येणं सुरू झालं, त्या वेळेस विविध प्रकारचे शारीरिक कार्यक्रम उदाहरणार्थ लाठीकाठी, दांडपट्टा, लेझीम या माध्यमातून शारीरिक शक्तींचे जागरण, विविध प्रकारच्या बौद्धिक व भाषणांच्या माध्यमातून लोकांमध्ये देशाच्या व समाजाच्या परिस्थितीचे जागरण लोकमान्य टिळक करू शकले. त्यानंतरसुद्धा गणेश उत्सवाची प्रथा सुरूच राहिली. आजही अनेक गणेश उत्सवांमध्ये विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. त्यामध्ये विविध प्रकारच्या विषयांवर भाषणेसुद्धा आयोजित केली जातात. विविध निबंध स्पर्धा आणि वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्या गणेश उत्सवांच्या माध्यमातून समाजामध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोषाची भावना निर्माण होऊ शकली, आज समाजामध्येसुद्धा अनेक नको असलेल्या गोष्टी आहेत. या नको असलेल्या गोष्टी, किती हानिकारक आहे, हे जर समाजाला यानिमित्ताने समजू शकले तर त्याबद्दलसुद्धा असंतोष निर्माण होईल.

समाज त्याविरुद्ध सुद्धा एकजूट होईल आणि गणेश उत्सवाचा उद्देश सार्थ ठरेल. परंतु, अनेक मंडळ हा उद्देश विसरत चालले आहेत, असं वाटतं. अनेक मंडळांमध्ये डीजे, चित्रपटाची गाणी, चित्रपट, डांस असेच कार्यक्रम केले जातात. हे सर्व कार्यक्रम करण्यासाठी दुसरे पण माध्यम उपलब्ध आहेत. त्यासाठी गणेशोत्सव हे माध्यम नसावे. कारण गणेशोत्सवाचा उद्देश, समाज विरोधी, समाज विघातक, मग ती राजसत्ता असेल किंवा इतर कोणत्याही सत्ता परंतु समाजविघातक गोष्टींबद्दल समाजाच्या मनामध्ये असंतोष निर्माण करणे, त्यांना एकत्र आणणे व त्यातून सामाजिक कुरीती नष्ट करण्यासाठी जनमानस एकत्रित करणे, हाच उद्देश नेहमी समोर असायला पाहिजे. लोक वर्गणी देतील. गणपतीची मोठी मूर्ती आणली जाईल, चांगली शोभा केली जाईल, लाईटिंगसुद्धा लावली जाईल, परंतु जर उद्देश डोळ्यासमोर ठेवला गेला नाही तर मात्र ही एक यांत्रिक प्रक्रिया ठरू शकते. यातून सामाजिक बदलाची प्रेरणा निर्माण होणार नाही. समाज एकत्र होणार नाही आणि हेतू साध्य होणार नाही, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

आता महालक्ष्मी पूजनसुद्धा सुरू आहे. आमचा देश हा धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ यांना मानणारा देश आहे. व्यक्तीच्या जीवनामध्ये अर्थाचे फार मोठे स्थान आहे. परंतु, अर्थोत्पादन कसे करावे? तर ते धर्माच्या मार्गानेच केले जावे, असे सांगितलेले आहे. त्यामुळे आमच्या देशामध्ये अर्थ, पैसा, संपत्ती या सर्वच गोष्टींना आम्ही लक्ष्मी रूपात पाहतो. लक्ष्मी म्हणजे स्वकष्टाने, विविध उद्योग करून, विविध प्रकारच्या कलांच्या आधारे, निर्माण केल्या गेलेली संपत्ती होय. आम्ही लक्ष्मीची आराधना करतो. आम्ही स्थिर लक्ष्मी प्राप्त व्हावी, असे वरदान मागतो. स्थिर लक्ष्मी का? तर लक्ष्मी ही सतत इकडून तिकडे जात असते. म्हणजेच काय तर व्यक्तीच्या जीवनामध्ये श्रीमंती आणि गरिबी हे प्रसंग, आर्थिक परिस्थितीमध्ये कमी जास्त पणा हा येत राहतो, येऊ शकतो. म्हणून आम्ही स्थिर लक्ष्मीसाठी प्रार्थना करतो. आमच्या देशामध्ये आज विविध प्रकारच्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, सरकारी अधिकार्‍यांद्वारे, खाजगी क्षेत्रातील मोठ्या अधिकार्‍यांनीसुद्धा भ्रष्टाचार केल्याच्या घटना घडत असतात. सातत्याने आम्ही त्या वाचत असतो. अशा लोकांजवळ जमा झालेली ही संपत्ती ही अलक्ष्मी आहे. आम्हाला सुख-समृद्धी देणारी लक्ष्मी पाहिजे आहे. भ्रष्टाचारातून निर्माण झालेली संपत्ती ही चिंता उत्पन्न करणारी आहे. सतत काहीतरी खोटेनाटे कारण सांगून तिचा बचाव करावा लागू शकतो.

व्यक्तीच्या जीवनामध्ये त्यामुळे नेहमीच चिंता राहू शकते. यातून सुख प्राप्त होणार नाही. वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतील. परंतु, शेवटी त्या सुविधांचा हिशोब ज्यावेळेला मागितला जाईल तर त्यातून दुःख प्राप्त होण्याची शक्यता अधिक आहे. म्हणून टेबलाखालून मिळणारी संपत्ती ही अलक्ष्मीच आहे. आमचा देश हा लक्ष्मीपूजकांचा देश आहे. आम्ही लक्ष्मीची पूजा ही विविध प्रकारच्या उद्योगांमधून, कलांमधून केली तरच ती लक्ष्मी आम्हाला आनंद देणारी सुख देणारी राहू शकेल. आज देशामध्ये काळ्या धनाची समस्या निर्माण झालेली आपण पाहतो आहे. काही लोकांचे खाते स्विस बँकेतसुद्धा आहे. जगातल्या विविध कानाकोपर्‍यात या लोकांनी आपली संपत्ती लपवून ठेवली आहे. ही संपत्ती त्यांना लपवावी लागते आहे. म्हणजेच ते तिचा जाहीरपणे आस्वादही घेऊ शकत नाही. नेहमी सरकार आणि आयकर विभागाची त्यांना भीती वाटत असते. हे काही चांगले लक्षण नाही. ज्या महालक्ष्मीच्या रूपाची आज आम्ही पूजा करीत आहोत ती महालक्ष्मी आम्हाला सुख-समृद्धी देणारी असण्यासाठी ती योग्य मार्गाने प्राप्त झाली पाहिजे. यासाठी वर्षभर प्रयत्न करणे आणि तिच्याबद्दल आपला भक्तिभाव प्रकट करण्यासाठी गौरी आवाहन, गौरी पूजन आम्ही करीत असतो. हा उद्देश आपण लक्षात ठेवला पाहिजे. आमच्या देशावर असलेले विदेशी बँकांचे कर्ज, परकीय देशांच्या सामानांनी भरलेल्या बाजारपेठा, समाजाची विदेशी वस्तूंबद्दलची आसक्ती व आमच्याच बांधवांनी निर्माण केलेल्या वस्तूंबद्दल असलेला न्यूनगंड या सर्वांतून व्यक्ती, समाज व राष्ट्र यांची मुक्तता करण्यासाठी, जगामध्ये होणारे बदल, जगाच्या गरजा व त्यामध्ये भारत काय भूमिका निभावू शकतो, मी काय भूमिका निभावू शकतो, अशा पद्धतीचा विचार व कार्य करणे हे आवश्यक आहे. गावागावांत, शहरोशहरी, राष्ट्राच्या व जगाच्या आवश्यकता पूर्ण करणार्‍या वस्तूंचे उत्पादन व्हावे, विक्री व्हावी, देश व समाज समृद्ध व्हावा, अशा पद्धतीचे कार्य करणे, हेच खरे... महालक्ष्मी पूजन आहे असे वाटते.

- 9552535813

(लेखक सुप्रसिद्ध वक्ते, सामाजिक व राजकीय विचारक आहेत.)

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur
Top