अनिल कांबळे,
नागपूर,
Traffic-police-constable-abused : मैत्रिणीसह कारने जाणाऱ्या वाहतूक पोलिस हवालदारावर दुचाकीस्वाराच्या टोळीने साईड न दिल्याच्या कारणावरुन हल्ला केला. या हल्ल्यात हवालदार जखमी झाला तर हवालदाराची कारची तोडफोड करण्यात आली.
या प्रकरण मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून १४ आरोपींची ओळख पटवली आहे. काही अल्पवयीन मुलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
तक्रारदार कुणाल मधुसूदन सिंह (३५, रा. ओल्ड मानकापूर) हे एमआयडीसी वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. २८ जून रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ते एका महिला मैत्रिणीसह कारने जरीपटकाहून घरी परतत होते. मार्टिननगर पुलाजवळ काही दुचाकीस्वारांची टोळी झिगझॅग पद्धतीने वाहने चालवत होती हवालदाराने हॉर्न दिल्यानंतर त्यांनी रस्ता मोकळा केला. मात्र, मानकापूर चौकाजवळ पोहोचण्यापूर्वी एका दुचाकीस्वाराने त्यांच्या कारला मागून धडक दिली.
परिस्थितीचा अंदाज घेत हवालदाराने काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बुलेटवरील एका युवकाने कार आडवी लावून त्यांना थांबवले. त्यानंतर इतर दुचाकीस्वारांनी कारला थांबवत शिवीगाळ केली आणि "वाहन का थांबवले नाही" या कारणावरून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी दगडाने कारच्या बोनटवर प्रहार करून मागील काच फोडली. हवालदार कारमधून बाहेर येताच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच एका आरोपीने दगडाने त्यांच्या मान आणि पाठीवर वार करून जखमी केले. दरम्यान, परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा होताच आरोपी पळून गेले. मात्र, सतर्क नागरिकांनी एका दुचाकीचा नोंदणी क्रमांक टिपून पोलिसांना दिला. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि वाहनांच्या नोंदणी क्रमांकांच्या आधारे पोलिसांनी सर्व आरोपींची ओळख पटविली.
आरोपी चोवीस तासांत ताब्यात
या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी बेकायदेशीर जमाव, दंगल, दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी, जाणीवपूर्वक अपमान करणे आणि मालमत्तेचे नुकसान करणे आदी भारतीय न्याय संहितेच्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये हर्ष ऊर्फ पिंडा आनंद पवार (२१), गौरव ऊर्फ मराठा मन्या मनोहर घिरडे (२६), संयम ऊर्फ भांजा गणेश पुरी (२०), यश सुरेश पारटेकी (२१), सत्यम नरेंद्र शिर्के (२०), प्रेमराज ऊर्फ सुजल अनिल ढाकटे (२०), आकाश वामन बोकडे (२०), नितीन राकेश गोखले (१८), विकी गजानन तेलघरे (२५), भीमदेव ऊर्फ सागर वामन बोकडे (१८), विकी अरविंद भाजणकर (२३), गणेश सुरेश उईके (२३), प्रितम ऊर्फ पांड्या लक्ष्मण मोडेकर (२१) आणि टिकाराम हेमराज बारापात्रे (२०) यांचा समावेश आहे. सर्व आरोपी पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत.
या घटनेतील काही अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज आणि दुचाकींच्या नोंदणी क्रमांकांच्या आधारे सर्व आरोपींची ओळख पटली आहे. गुन्ह्यातील कलमे जामीनपात्र असल्याने पुढील तपास सुरू आहे.
- हरीश काळसेकर, ठाणेदार (मानकापूर)

