Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
यामिनी ते अस्मिता; पदकांच्या शर्यतीत भारताची दमदार मुसंडी!

यामिनी ते अस्मिता; पदकांच्या शर्यतीत भारताची दमदार मुसंडी!

ग्लासगो,

Cwg-2026 : स्कॉटलंडमधील ग्लासगो शहरात सुरू असलेल्या राष्ट्राकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष खिळले आहे. यंदाच्या स्पर्धेत भारताचे वर्चस्व असणारे काही खेळ वगळण्यात आल्यामुळे पदकांची संख्या घटण्याची भीती व्यक्त केली जात होती.

मात्र, भारतीय युवा आणि अनुभवी खेळाडूंनी ही भीती फेटाळून लावत आपल्या अद्भूत कामगिरीने सर्वांचे मन जिंकले आहे. अनेक नवीन आणि आव्हानात्मक क्रीडा प्रकारांमध्ये भारताने प्रथमच सुवर्णपदके जिंकून संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.

ज्युडोमध्ये भारताचा ऐतिहासिक सुवर्णधमाका

राष्ट्राकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात भारताने ज्युडो क्रीडा प्रकारात अभूतपूर्व यश संपादन केले आहे. आसामच्या २३ वर्षीय अस्मिता डेने महिलांच्या ४८ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. ही वाटचाल सोपी नव्हती, कारण स्पर्धेच्या केवळ ७ महिने आधी तिच्या वडिलांचे निधन झाले होते. या अत्यंत कठीण परिस्थितीत मनोधैर्य राखून तिने क्रीडांगणावर सुवर्णमय कामगिरी केली.

तसेच पुरुषांच्या ६० किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये हर्ष सिंहने सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल खेळांच्या इतिहासात ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. याशिवाय महिलांच्या ५७ किलो वजनी गटात यामिनी मौर्यने उत्कृष्ट प्रदर्शन करत रौप्यपदक आपल्या नावे केले.

भालाफेकीत नीरज आणि यश वीरची दुहेरी चमक

भालाफेक स्पर्धेत स्टार अ‍ॅथलीट नीरज चोप्राकडून पदकाची मोठी अपेक्षा होती आणि उसने रौप्यपदक जिंकून ती पूर्ण केली. याच स्पर्धेत भारताच्या यश वीर सिंहनेही चमकदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावून सर्वांचे मन जिंकले.

कॉमनवेल्थ गेम्स २०२६: भारताचे आतापर्यंतचे सर्व पदकविजेते खेळाडू

सुवर्णपदक विजेते खेळाडू

भारतासाठी पुरुष १०० मीटर T47 शर्यतीत दिलीप गावितने, महिला शॉट पुट F57 प्रकारात शर्मिलाने, ज्युडोमध्ये अस्मिता डे (महिला ४८ किग्रा) आणि हर्ष सिंहने (पुरुष ६० किग्रा), तर महिला वेटलिफ्टिंगच्या ४८ किग्रा गटात मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावले आहे.

रौप्यपदक विजेते खेळाडू

अ‍ॅथलेटिक्समध्ये पुरुष १०,००० मीटर शर्यतीत गुलवीर सिंहने, पुरुष १०० मीटर T47 शर्यतीत मोहम्मद बासिलने, पुरुष हाय जंपमध्ये सर्वेश कुशारेने, पुरुष भालाफेकीत नीरज चोप्राने, तर पुरुष लांब उडीत मुरली श्रीशंकरने रौप्यपदक मिळवले आहे.

ज्युडोमध्ये महिला ५७ किग्रा गटात यामिनी मौर्यने रौप्यपदकावर नाव कोरले. वेटलिफ्टिंगमध्ये भारताला सर्वाधिक रौप्यपदके मिळाली आहेत, ज्यामध्ये पुरुष ११०+ किग्रा गटात लव्हप्रीत सिंह, पुरुष ६० किग्रा गटात ऋषिकांत सिंह, पुरुष ६५ किग्रा गटात राजा मुथुपांडी, पुरुष ७९ किग्रा गटात वल्लूरी अजय बाबू, महिला ५३ किग्रा गटात ज्ञानेश्वरी यादव आणि महिला ६९ किग्रा गटात हरजिंदर कौर यांनी रौप्यपदके पटकावली आहेत.

कांस्यपदक विजेते खेळाडू

पुरुष डेकाथलॉनमध्ये तेजस्विन शंकरने, पुरुष भालाफेकीत यश वीर सिंहने, महिला डिस्कस थ्रोमध्ये सीमाने आणि महिला शॉट पुट F57 प्रकारात शिल्पा के शायलाने कांस्यपदक जिंकले आहे. तसेच महिला वेटलिफ्टिंग ५८ किग्रा गटात बिंदियारानी देवी आणि पुरुष हेव्हीवेट पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये झंडू कुमार यांनी कांस्यपदक पटकावून भारताच्या खात्यात भर घातली आहे.

आता लक्ष बॉक्सिंगच्या रिंगवर: १० पदके निश्चित!

यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी धुमाकूळ घातला आहे. महिला आणि पुरुष दोन्ही विभागांत मिळून तब्बल १० भारतीय बॉक्सर फायनल (अंतिम फेरी) मध्ये पोहोचले आहेत, ज्यामुळे भारताची १० पदके पक्की झाली आहेत. १ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या फायनल सामन्यांनंतर पदकांचा रंग स्पष्ट होईल. या बॉक्सिंगच्या सामन्यांनंतर भारताची एकूण पदकसंख्या ३० च्या पार जाण्याची दाट शक्यता आहे, जो पूर्वअंदाजापेक्षा अत्यंत उत्कृष्ट आणि ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur