Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
येथे मृत्यूनंतरही भोगाव्या लागतात यातना !

येथे मृत्यूनंतरही भोगाव्या लागतात यातना !

गोंदिया,

Cremation-of-old-woman : एकीकडे शासन-प्रशासनाकडून ग्रामीण विकास, पायाभूत सुविधा आणि अंत्योदयचे मोठमोठे दावे केले जात असताना दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील लटोरी ग्रामपंचायतीत घडलेल्या एका हृदयद्रावक आणि लज्जास्पद घटनेने हे दावे कुठेतरी फोल ठरल्याचे दिसून आले आहे.

स्मशान शेड अभावी एका ८५ वर्षीय वृद्ध महिलेवर मुसळधार पावसात ताडपत्रीचा आधार घेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने मृत्यूनंतर शरणालाही यातना भोगाव्या लागत असल्याचे भयावह वास्तव पुढे आले आहे.

सालेकसा तालुक्यातील लटोरी येथील दुलमतबाई भीवराम मच्छीरके (८५) यांचे २९ जुलै रोजी निधन झाले. कुटुंबीयांनी ३० जुलै रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली. मात्र, सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि स्मशानभूमीत कोणत्याही प्रकारच्या छताची अथवा शेडची व्यवस्था नसल्याने अंत्यसंस्कार करणे अत्यंत कठीण झाले. पाऊस इतका जोरात होता की, शरण तयार करणेही अवघड झाले. अशा परिस्थितीत नातेवाईक आणि ग्रामस्थांनी नाईलाजाने बांबूचा तात्पुरता मंडप उभारून त्यावर ताडपत्री बांधून कशीतरी अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण केली.

हे दृश्य तेथे उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रू आणणारे होते. ग्रामस्थांच्या मते ही केवळ एका कुटुंबाची वेदना नसून अनेक वर्षांपासून गावकर्‍यांच्या या समस्येकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षामुळे संपूर्ण गावाला या यातना भोगाव्या लागत आहेत. गावाच्या स्मशानभूमीत शेड उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची असून ग्रामपंचायत ते संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींपर्यंत अनेकदा निवेदने देण्यात आली, मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासनच मिळाले. पावसाळ्यात गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांसमोर अंत्यसंस्कार करण्याचे मोठे संकट उभे राहते. उघड्या आकाशाखाली पेटणारी चिता, मुसळधार पाऊस, चिखल आणि अव्यवस्थेमध्ये अंत्यसंस्कार करणे हे केवळ कठीणच नाही, तर मृत व्यक्तीच्या सन्मान आणि मानवी प्रतिष्ठेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. तेव्हा संबंधित विभाग व विशेषतः लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

विकासाचे दावे पोकळ...

निवडणुकीच्या काळात विकासाची मोठमोठी आश्वासने दिली जातात, मात्र मूलभूत सुविधांकडे कोणाचेही लक्ष नसते. ज्या गावात नागरिकांना सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची सुविधादेखील उपलब्ध नाही, त्या गावातील विकासाचे दावे पूर्णपणे पोकळ ठरतात.

अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन...

भविष्यात कोणत्याही कुटुंबावर अशी वेदनादायी आणि अपमानास्पद वेळ येऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत व लवकरात लवकर लटोरी ग्रामपंचायतीच्या स्मशानभूमीत कायमस्वरूपी शेडचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली असून अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur