Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

आयआयटी बॉम्बेच्या सहकार्याने ७० विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे मार्गदर्शन

आयआयटी बॉम्बेच्या सहकार्याने ७० विद्यार्थ्यांना उद्योजकतेचे मार्गदर्शन

सोलापूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव-सोलापूर येथील उद्योजकता विकास कक्षाच्या (ई-सेल) वतीने आयआयटी बॉम्बेच्या ई-सेलच्या सहकार्याने 'इल्युमिनेट' या विशेष उद्योजकता मार्गदर्शन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात विविध अभियांत्रिकी शाखांतील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची जाणीव निर्माण करणे आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांना व्यवसायाचे स्वरूप देण्यासाठी प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमात आयआयटी बॉम्बेच्या ई-सेलचे प्रतिनिधी यासीन शेख यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकीय मानसिकता, नाविन्यपूर्ण कल्पनांचे स्टार्टअपमध्ये रूपांतर, व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन आणि निधी उभारणीच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच आयआयटी बॉम्बेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या 'युरेका!' आणि नॅशनल एंटरप्रेन्योरशिप चॅलेंज (NEC) या उपक्रमांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना उद्योजकीय संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण व्यावसायिक संकल्पना मांडल्या. प्रश्नोत्तरांच्या सत्रात स्टार्टअपची उभारणी, व्यवसायातील आव्हाने आणि उद्योजकतेच्या क्षेत्रातील उपलब्ध संधी यासंदर्भातील विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना उद्योजकतेच्या व्यावहारिक पैलूंची माहिती मिळाली.

विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या संधी शोधण्यापुरते मर्यादित न राहता रोजगारनिर्मिती करणारे उद्योजक बनावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांनी केले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाला संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. ई-सेलचे प्राध्यापक समन्वयक प्रा. एम. आर. सपाळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी टीमने कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन यशस्वीरीत्या केले.

आयआयटी बॉम्बेसारख्या नामांकित संस्थेच्या उद्योजकता परिसंस्थेशी सोलापूरच्या विद्यार्थ्यांना जोडणारा 'इल्युमिनेट' हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नाविन्यपूर्ण विचार, आत्मविश्वास आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रेरणादायी ठरला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur