Dailyhunt
भगवंत प्रकटदिन उत्साहात साजरा; कीर्तन, नगर प्रदक्षिणात भाविकांचा उस्फूर्त सहभाग

भगवंत प्रकटदिन उत्साहात साजरा; कीर्तन, नगर प्रदक्षिणात भाविकांचा उस्फूर्त सहभाग

गवंत प्रकटदिन उत्साहात साजरा; कीर्तन, नगर प्रदक्षिणात भाविकांचा उस्फूर्त सहभाग

बार्शी - ग्रामदैवत श्री भगवंत यांच्या प्रकटदिनानिमित्त आयोजित जयंती उत्सव यंदा मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

वैशाख शुद्ध द्वादशीनिमित्त मंगळवारी पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, दिवसभर विविध उपक्रमांनी संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात निर्माण झाले होते.

उत्सवाची सुरुवात पहाटे हभप जयवंत बोधले महाराज यांच्या प्रभावी कीर्तनाने झाली. या कीर्तनाला भाविकांनी मोठी उपस्थिती लावली. बोधले महाराजांनी आपल्या कीर्तनातून अध्यात्म, भक्ती आणि संस्कारांचे महत्त्व पटवून दिले.

कीर्तनानंतर सकाळी शहर व तालुक्यातील विविध भजनी मंडळे, वारकरी संप्रदायातील भक्त, तसेच नागरिकांनी मोठ्या उत्साहात श्री भगवंताची उत्सव मूर्तीची नगर प्रदक्षिणा काढली. सनई-चौघडा, बँड पथक, ढोल-ताशा आणि भजनांच्या गजरात ही नगर प्रदक्षणा निघाली.

या नगर प्रदक्षिणाची सुरुवात श्री भगवंत मंदिरातून होऊन ती भगवंत मंदिर रोड, महाद्वार चौक, चाटे गल्ली, पटेल चौक, कापड गल्ली, सोमवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज रोड, शिवसृष्टी परिसर असा मार्गक्रमण करत पुन्हा मंदिर परिसरात सकाळी साडेदहा वाजता विसर्जित करण्यात आली.

दिंडी जसजशी मार्गक्रमण करत होती, तसतसा भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचत होता. शोभायात्रेत अनेक ठिकाणी महिला आणि पुरुषांमध्ये फुगडीचे खेळ रंगले. मात्र सर्वांचे लक्ष वेधले ते डॉ. जयवंत बोधले महाराज आणि ऍड. रणवीर राऊत यांच्या फुगडीने. भर दिंडीत या दोघांनी धरलेला फुगडीचा फेर पाहून उपस्थित भाविकही भारावून गेले.

कीर्तनानंतर सकाळी ९ वाजता बाजार समितीचे माजी सभापती ऍड. रणवीर राऊत यांच्या हस्ते श्री भगवंताच्या पंचधातूच्या उत्सवमूर्तीची रथात विधीवत प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. उत्सवादरम्यान विविध ठिकाणी भाविकांसाठी पिण्याचे पाणी, लिंबू सरबत आदींची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील अनेक सामाजिक संस्था व स्वयंसेवकांनी यात सहभाग घेतला.

२५ हजार भाविकांचा महाप्रसाद लाभ

नगरसेवक विजयनाना राऊत यांच्या नेतृत्वाखाली मॉर्निंग सोशल फाउंडेशनने महाप्रसादाचे आयोजन केले होते. दिवसभरात सुमारे २५ हजार भाविकांनी श्री भगवंताच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.

या उत्सवात भगवंत देवस्थान ट्रस्टचे सरपंच दिलीप बुडुख, नगराध्यक्ष तेजस्विनी कथले, कविता राऊत, सभापती मीनाक्षी रोंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur