Dailyhunt
कडक बंदोबस्तात नीट परीक्षा शांततेत पार; १५ केंद्रांवर ५,५६६ विद्यार्थ्यांची उपस्थिती

कडक बंदोबस्तात नीट परीक्षा शांततेत पार; १५ केंद्रांवर ५,५६६ विद्यार्थ्यांची उपस्थिती

डक बंदोबस्तात नीट परीक्षा शांततेत पार; १५ केंद्रांवर ५,५६६ विद्यार्थ्यांची उपस्थिती

सोलापूर - वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) रविवारी सोलापूर शहरातील १५ परीक्षा केंद्रांवर कडक शिस्तीत आणि शांततेत पार पडली.

शहरातील विविध केंद्रांवर एकूण ५,६९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५,५६६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर १२५ विद्यार्थी गैरहजर राहिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

नीट परीक्षेसाठी यंदा सोलापूर शहरात विशेष तयारी करण्यात आली होती. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणेद्वारे सतत निगराणी ठेवण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी घेण्यात आली. परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी मेटल डिटेक्टरच्या साहाय्याने विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी प्रशासनाने काटेकोर खबरदारी घेतली होती.

विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्याच्या एक तास आधी केंद्रावर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बहुसंख्य विद्यार्थी वेळेत केंद्रावर दाखल झाले. परीक्षा केंद्राबाहेर पालकांची मोठी गर्दी दिसून आली होती. विद्यार्थ्यांमध्ये उत्साहासोबतच काहीसा तणावही जाणवत होता.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी परीक्षेच्या व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी सोलापूर शहरातील सिद्धेश्वर प्रशाला, संगमेश्वर महाविद्यालय, देवकरण प्रशाला तसेच पालघर हायस्कूल या परीक्षा केंद्रांना भेटी देऊन सुविधांचा आढावा घेतला. परीक्षा प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हेही उपस्थित होते. एकूणच प्रशासनाच्या दक्ष नियोजनामुळे सोलापुरातील नीट परीक्षा कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur