Dailyhunt

टीमवर्कने काम केल्यास लोकमंगल विश्वाकडे वाटचाल करेल : सुभाष देशमुख

टीमवर्कने काम केल्यास लोकमंगल विश्वाकडे वाटचाल करेल : सुभाष देशमुख

सोलापूर : लोकमंगल परिवाराचा वर्धापन दिन, लोकमंगल कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच लोकमंगल समूह क्रीडा स्पर्धा २०२५ चा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि प्रेरणादायी वातावरणात लोकमंगल कॉलेज, वडाळा येथे संपन्न झाला.

कार्यक्रमास लोकमंगल परिवाराचे कुटुंब प्रमुख मा. सुभाष बापू देशमुख, लोकमंगल फाउंडेशनचे अध्यक्ष रोहन (दादा) देशमुख, विविध संस्थांचे पदाधिकारी, विभागीय अधिकारी, शाखाधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. तसेच लोकमंगल परिवारातील दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

प्रास्ताविकात रोहन देशमुख यांनी लोकमंगल परिवारातील सदस्यत्व हे केवळ नोकरीपुरते नसून निष्ठा, आपुलकी, प्रामाणिकपणा आणि एकजुटीची भावना आहे, असे सांगितले. सर्वांनी टीमवर्कने काम केल्यास कोणतेही कार्य यशस्वी होते, असे ते म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात मा. सुभाष बापू देशमुख यांनी लोकमंगल परिवाराने २८ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला असून 'घेण्यापेक्षा देण्याची भूमिका' महत्त्वाची असल्याचे सांगितले. गरजवंत, शेतकरी, उद्योजक आणि सामान्य नागरिकांच्या विकासासाठी संस्थांनी सातत्याने कार्य केले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. शहरातील २६ प्रभाग व ग्रामीण भागातील १८ शाखांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवून प्रत्येक ठिकाणी नियोजनबद्ध कार्यक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. ग्राहकांचा विश्वास संपादन करणे, ठेवीदारांचे हित जपणे, कर्मचाऱ्यांच्या प्रगतीसाठी काम करणे आणि "समृद्ध गाव" संकल्पना राबविणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत परमेश्वर जाधव, रेणुका वाघमोडे, स्वप्निल कदम, अजित कुरे, सतीश लोंढे व सुदन सुरवसे यांनी सहभाग घेतला.

विभागस्तरावर उत्कृष्ट कर्मचारी म्हणून अभिजीत भोईटे, रेवणसिद्ध सिद्धापुरे, सुनील शिंदे, पार्वती निचरे, गणेश भोपळे, हेमंत भोसले, मयुरा अवताडे व नितीन अलकुंटे यांचा गौरव करण्यात आला. तसेच लोकमंगल परिवाराकडून उत्कृष्ट कर्मचारी म्हणून सचिन फुगे, अमोल शिंदे, सचिन परमशेट्टी, अंकुश गायकवाड, मेहबूब शेख, अंजीखनी व राजश्री यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमात एकपात्री नाटक, भारूड, समूह नृत्य आदी सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत आणली.

यानिमित्ताने लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशन आयोजित लोकमंगल समूह क्रीडा स्पर्धा २०२५ चा पुरस्कार वितरण सोहळाही पार पडला. विविध संस्था, कर्मचारी व खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. क्रिकेट स्पर्धेत लोकमंगल पतसंस्था संघाने प्रथम क्रमांक, तर लोकमंगल बँक संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. खो-खो पुरुष व महिला गटात लोकमंगल पतसंस्थेने विजेतेपद मिळविले. कबड्डी स्पर्धेतही पतसंस्था संघाने बाजी मारली. व्हॉलीबॉल स्पर्धेत लोकमंगल कॉलेज संघ विजेता ठरला, तर रस्सीखेच महिला गटात लोकमंगल पतसंस्थेने प्रथम क्रमांक मिळविला.

तसेच १०० मीटर, २०० मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी आदी वैयक्तिक स्पर्धांमध्ये अनेक खेळाडूंनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली. विजेत्या संघांना व खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

या क्रीडा स्पर्धेमुळे लोकमंगल समूहातील अधिकारी, कर्मचारी व विविध संस्थांमध्ये एकोपा, उत्साह आणि क्रीडा संस्कृतीला चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास लोकमंगल कॉलेजच्या सचिव डॉ. अनिता ढोबळे, लोकमंगल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या अध्यक्षा तथा लोकमंगल पतसंस्थेच्या व्यवस्थापिका अलका देवडकर, कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सरोजनी निकम, सचिव सदन सुरवसे, दीपाली कोठारी, शोभा बोल्ली मॅडम, संचालक मंडळ सदस्य, विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur