Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nashik: गंगापूररोडला समांतर रस्त्यावर अखेर मुख्यमंत्र्यांचीच फुली

Nashik: गंगापूररोडला समांतर रस्त्यावर अखेर मुख्यमंत्र्यांचीच फुली

Devendra Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक (Nashik): नाशिक व त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने राजकारणी व विकासक मिळून अनेक सोयीची कामे सूचवली जातात व केली जातात.

नाशिक शहरातील असाच एक रस्ता व्हावा यासाठी मंत्री, आमदार व महापौर यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत, तो म्हणजे गंगापूर रोडला समांतर रस्ता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सिंहस्थ कुंभमेळा शिखर परिषदेत या रस्त्याचा मुद्दा मांडला गेला. मात्र, मुख्यमंत्र्यांनीच अखेर लग्नात बारसे उरकण्याचे प्रकार करू नका, अशा शब्दात उत्तर दिले आहे. यामुळे आता या सिंहस्थाच्या कामांमध्ये तरी गंगापूररोडला समांतर रस्त्यावर आता मुख्यमंत्र्यांनीच फुली मारल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानातील महाघोटाळ्याची SIT चौकशी करा

नाशिक व त्र्यंबकेश्वर परिसरात सिंहस्थ कुंभमेळानिमित्ताने दर बारावर्षांनी केंद्र व राज्य सरकारकडून मोठा निधी येत असतो. सिंहस्थाच्या निमित्ताने त्या वाहत्या गंगेत हात धुऊन घेण्याचाही प्रयत्न केला जातो. किंबहुना त्यात सिंहस्थातील प्राधान्यक्रमापेक्षा गुंतवणूकदारांच्या हिताचा अधिक विचार होत असतो.

नाशिकमध्ये सिंहस्थ काळात यापूर्वी असे अनेक, रस्ते, पूल बांधले गेल्याचे नाशिककरांना माहित आहे. आताही २०२७ च्या सिंहस्थात तर यापूर्वी कधीच आला नाही, एवढ्या निधीची कामे सरकारने मंजूर केली आहेत. त्यामुळे सिंहस्थातील या निधीच्या वाहत्या गंगेत आपल्या हिताची कामे घुसवण्यास राजकारणी, विकासक यांनी प्रयत्न केले नाही तरच नवल. असाच एक रस्ता गेल्या चार महिन्यांपासून अधून मधून चर्चेला येत असतो.

गंगापूररोड हा नाशिक शहरातील उच्चभ्रू रस्ता असून तो सध्या अपुरा पडत असल्याने त्याच्यावरील भार कमी होण्यासाठी त्याला समांतर गोदावरीच्या पलिकडून रस्ता व्हावा, ही ती मागणी आहे.

Kumbh Mela 2027 Nashik: सिंहस्थासाठी नाशिकमध्ये 3 हजार कोटींच्या 16 प्रकल्पांना केंद्राचा ग्रीन सिग्नल

याबाबत माजीमंत्री माणिकराव कोकोटे यांनी पहिल्यांदा नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांचा भेट घेतली. यावेळी त्यांनी गंगापूररोडला समांतर रस्ता व नाशिकरोड ते सिन्नर या मार्गाला समांतर रस्त्याचा सिंहस्थाच्या कामात समावेश करावा, अशी मागणी केली. त्या मागणीच्या दुस-या दिवशीच केंद्रीय रस्ते निधीतून नाशिकरोड ते सिन्नर या मार्गाला समांतर रस्ता मंजूर झाल्याची माहिती खासदार राजाभाऊ वाजे यांनी दिली होती. त्यामुळे तो रस्ता मार्गी लागला. मात्र, गंगापूररोडला समांतर रस्त्याचा विषय तसाच प्रलंबित राहिला.

त्यानंतर महापौर झाल्यानंतर हिमगौरी आडके यांनीही काही दिवसांपूर्वी गंगापूररोडला समांतर रस्ता होण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र, त्या मागणीलाही काही प्रतिसाद मिळाला नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेल्या सिंहस्थ कुंभमेळा शिखर परिषद घेतली.

या परिषदेला संबंधित मंत्री, आमदार, कुंभमेळा प्राधिकरण अधिकारी व पुरोहित संघाचे प्रतिनिधींसह महापालिका, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमदार देवयानी फरांदे यांनी त्यांच्या मतदारसंघातील काही कामांचा समावेश सिंहस्थाच्या आराखड्यात व्हावा, हे मांडतानाच गंगापूररोडला समांतर रस्ता करणे किती आवश्यक आहे, हे आकडेवारी मांडून सांगितले.

'आदिवासी विकास'चा अजब कारभार; काम 2 कोटीचे, देयक दिले 27 हजार रुपये

आता गोदावरीच्या पलिकडे किती बांधकाम झाले असून भविष्यात त्यात कशी वाढ होणार आहे, हेही सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही त्यात गांभीर्य वाटले. त्यांनी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांना या रस्त्याच्या कामाबाबत विचारले. मात्र, त्यांनी सिंहस्थात किती व कोणती कामे करायची, याच्या सीमारेषा निश्चित करण्याची गरज आहे, अशा आशयाचे उत्तर दिले. त्यातून मुख्यमंत्र्यांनी योग्य तो अर्थ समजून घेतला.

त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी थेटपणे सिंहस्थात कामे सूचवताना लग्नात बारसे उरकून घेण्याचे प्रकार करू नका, जणू असाच इशारा दिला. यामुळे मुख्यमंत्र्यांनीच गंगापूररोडला समांतर रस्त्याला फुली मारल्याचे स्पष्ट झाल्याने हा विषय मागे पडल्याचे स्पष्ट झाले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama