नाशिक (Nashik): देशभरातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) सर्व टोल नाक्यांवर एक एप्रिलपासून केवळ डिजिटल स्वरुपात टोल स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे केवळ फास्टटॅग व यूपीआयद्वारे टोलची रक्कम स्वीकारली जाणार आहे.
यामुळे एक एप्रिलपासून रोख स्वरूपात टोल स्वीकारणे बंद करण्यात येणार आहे.
Budget Session 2026: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू; विकासकामे, आर्थिक शिस्तीवर भरदेशभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे राष्ट्रीय महामार्ग उभारणी केली जाते. ही उभारणी बांधा, वापरा व हस्तांतरण करा, या तत्वावर असल्याने या रस्ता उभारणीचा खर्च टोलच्या माध्यमातून वसूल केला जातो. मात्र, या टोल वसुलीत पारदर्शकता नाही. तसेच टोल भरण्यासाठी वाहने टोल नाक्यावर खूप वेळ उभी करावी लागतात, अशा तक्रारी वाढल्या. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने फास्टटॅग प्रणाली आणली.
या प्रणालीला वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या देशभरात राष्ट्रीय महामार्गावर वसूल केला जाणाऱ्या टोल मधून ९८टक्के रक्कम ही फास्टटॅगद्वारे येत असते. टोल नाक्यांवर यूपीआयद्वारे टोल भरणाऱ्या वाहन धारकांकडून सव्वा पट व रोखीने भरणाऱ्या वाहनधारकांकडून दुप्पट दराने वसुली केली जाते. यात बदल करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणने घेतला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने म्हटले आहे, की या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर, राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावरील सर्व टोल नाक्यांवर केवळ डिजिटल पद्धतींद्वारे, फास्टॅग किंवा यूपीआय वापरून टोल वसुली प्रक्रिया केली जाणार आहे. डिजिटल राष्ट्रीय महामार्ग टोल प्रणाली विकसित करण्यासाठी प्राधिकरण एक एप्रिल २०२६ पासून देशभरातील राष्ट्रीय महामार्ग फी प्लाझावर रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याचा विचार करीत आहे.
नव्या निर्णयामुळे राष्ट्रीय महामार्गांवरील प्रवास अधिक सुलभ होईल, असा दावा प्राधिकरणने केला आहे. यामुळे सर्व देशभर राष्ट्रीय महामार्गांवर डिजिटल पेमेंट प्रणाली लागू होईल. यामुळे वाहनांना राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यांवरील वाहतूक कोंडी टाळता येईल,वाहनांच्या रांगा कमी होऊन प्रवास गतिमान होईल, असा प्राधिकरणचा दावा आहे.
या निर्णयाचा महाराष्ट्रातील वाहनधारकांनाही फायदा होणार आहे. महाराष्ट्रात टोल १०८ टोलनाके असून त्यात प्रामुख्याने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, मुंबई-नाशिक, पुणे- कोल्हापूर, नागपूर-अमरावती या प्रमुख महामार्गावरील टोलनाक्यांचा समावेश आहे.
टोलनाके दृष्टीक्षेपात...
देशभरातील टोलनाक्यांची संख्या : ११५०
फास्टॅगद्वारे टोल भरणारे वाहनचालक : ९८ टक्के
रोखीने भरल्यास लागणारे टोल शुल्क : दुप्पट
यूपीआयद्वारे भरल्यास टोल शुल्क: सव्वापट

